हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील हरताळा फाटा ते गाव रस्त्यावर निंबाचे झाड व इतर दोन झाडे ही बुंध्यापासून शेंड्यापर्यंत पूर्ण सुकलेले असून, कीड लागली आहे. यामुळे हे झाड केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हे झाड असलेल्या रस्त्यावर नेहमी रहदारी असते अचानक झाड कोसळल्यास कोणासही इजा पोहोचू शकते. तरी संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन होणारा अनर्थ टाळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
हरताळा फाटा ते गाव रस्त्याने अशी तीन ठिकाणी सुकलेली झाडे आहेत. त्यापैकी पन्नास-साठ वर्षांपूर्वीचे निंबाचे झाड सुकले आहे. पुढेच शेताच्या बांधावर वावडीचे झाडही सुकले आहे. त्यांच्या फांद्या लांब वाढलेल्या असल्याने त्या हवेमुळे कोणत्याही क्षणाला पडू शकतात. वादळ वारा असो नसो कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे.
यापूर्वीदेखील संबंधित विभागाच्या लक्षात आल्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन या झाडाच्या फांद्या व सुकलेले झाड त्वरित कापून भविष्यात होणारा अनर्थ टाळावा, अशी मागणी वाहनचालक व पादचारी सर्वांकडून होत आहे.
हरताळा फाटा ते गाव रस्त्यावर निंबाचे सुकलेले झाड.
(छाया : चंद्रमणी इंगळे)