दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या फेकरी रेल्वे उड्डाणपुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने अपघातात प्राणहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.फेकरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या फेकरी रेल्वे उड्डाणपुलावरील संरक्षण कठडाचे पाईप व काही भाग पडल्याने येथे जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांना प्राण गमावण्याचीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.या महामार्गावरून पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहने, बस मिनीडोअर वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. संरक्षण कठडे नसल्याने खालीदेखील वाहने कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याशिवाय याच कठड्याचा आधार घेऊन उभे केलेले लोखंडी पाइपदेखील तुटून पडलेले आहेत. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या तुटलेल्या घटनेबाबत दुरुस्तीबाबत गेल्या दोन वर्षांपासून या सुरक्षेबाबत कोणत्या प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. भविष्यात या पुलावर मोठ्या अपघाताची दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न सध्या वाहनधारकांना भेडसावत आहे. त्याचप्रमाणे दीपनगर सरगम गेटपर्यंत टोलची हद्द असून तेदेखील दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असून भीती तर आहेच पण या वाहनांकडून टोल वसूल केला जातो.फेकरी रेल्वे उड्डाणपुलाचे कठडे तोडून दोन वर्ष होऊनदेखील दुरुस्त होत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे व संताप व्यक्त केला जात आहे.फेकरी टोलचे मॅनेजर योगेश गुंजाळ यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सार्वजनिक विभाग यातील वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष द्यावे, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.