जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून दिल्यानंतरही ते महसूल विभागाने सोडून दिल्याचा आरोप दापोरा येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या बाबत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, अवैध वाळू वाहतुकीची पाहणी करण्यासाठी नदीपात्रात गेल्यानंतर तेथे सर्व ठेका घेतलेले वाहनधारक वाळू उपसा करीत असल्याचे आढळून आले.या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा परिसरात गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपशाची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी गावातील काही तरुण पोहचले. त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत सोनवणे व इतर तरुणांनी वाळूचा अवैध उपसा करणारे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १९, बी.क्यू. ६७२०) पकडले व या बाबत महसूल विभागास कळविले.त्यानंतर तेथे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील हे पोहचले. त्या वेळी ट्रॅक्टर चालक व मजूर पळून गेले. त्यामुळे ट्रॅक्टर नेण्यास कोणीही नसल्याने भागवत सोनवणे व पोलीस पाटील जितेश गवंदे यांनी शिरसोलीकडे हे ट्रॅक्टर नेण्यास मदत केली. मात्र त्या ठिकाणी तुम्ही जा, असे सांगून हे ट्रॅक्टर सोडून देण्यात आल्याचा आरोप भागवत सोनवणे यांनी केला आहे.दरम्यान, दापोरा येथे शाळेसमोरून वाळू वाहतूक करणारे वाहने सुसाट वेगाने जात असतात. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती असून त्यास आळा बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असलो तरी त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप भागवत सोनवणे यांनी केला आहे.जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, अवैध वाळूच्या उपशास रोखण्यासाठी आपण गिरणा पंपिग परिसरातील गिरणा नदीपात्रासह मोहाडी, दापोरा शिवारात गेलो होतो, मात्र त्या ठिकाणी चोरटी वाळू वाहतूक करणारे एकही वाहन सापडले नाही. जी वाहने होती त्यांच्याकडे परवाना असल्याचे आढळून आले, त्यामुळे आज एकही वाहन पकडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
धक्कादायक : जळगाव तालुक्यात वाळू उपसा करताना पकडलेले ट्रॅक्टर अधिकाऱ्यांनी दिले सोडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:20 PM
दापोरा ग्रामस्थांचा आरोप
ठळक मुद्देप्रांताधिका-यांचा इन्कार प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप