ऑनलाईन लोकमत
नशिराबाद, जि.जळगाव, दि. 13 - अस्वच्छतेचा गराडा, अनियमित 5 ते 6 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा व वातावरणातील बदलामुळे येथे सर्दी, खोकलासह तापाने रुग्ण फणफणले आहे. त्यात मन्यार मोहल्यातील (काटय़ाफाईल परिसर) सईदाबी शेख इसाक (वय 42) या महिलेचा रविवारी डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नशिराबादसह परिसरात डेंग्यूसह साथीचे आजाराने डोके वर काढले आहे. अजून 3 ते 4 रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लागण असल्याचे सांगण्यात आले. साथीच्या आजारावर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राने अद्यापर्पयत कुठलीही ठोस उपाययोजना केली नसल्याने त्याबाबत ग्रामस्थ नाराजी व संताप व्यक्त करत आहे.मन्यार मोहल्यातील सईदाबी शे. इसाक हे गेल्या आठवडय़ापूर्वी तापाने फणफणले होते. त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले; मात्र अद्याप ताप कमी होत नसल्याने जळगावी खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली त्यात डेंग्यू पॉङिाटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गावात सर्दी, खोकला तापाने रुग्ण फणफणले आहे. दरम्यान वरची आळीतील दीड वर्षीय बालकास डेंग्यूची लागण झाली आहे. त्याच्यावर जळगावी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.गावात डेंग्यूने शिरकाव केल्याने नागरिक धास्तावले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनी याबाबत दखल घ्यावी. मन्यार मोहल्ला परिसरात अस्वच्छता आहे. गटारींची स्वच्छता नियमित होत नसल्याची ओरड परिसरातील रहिवाश्यांची आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार पसरत आहे. याबाबत ओरड होऊनही ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राने दखल घेत नसल्याचा संताप व्यक्त होत आहे. गटारींवर जंतूनाशक फवारणी व गावात फॉगिंग मशिनद्वारे धूरळणी करावी, अशी मागणी होत आहे. गावात डेंग्यूसह साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.ू