- स्टार : ७५२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाउन काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले तर अनेकांचा रोजगार बुडाला. दुसरीकडे वर्षभरापासून अंध व्यक्तींना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी मिळेल ते काम करून कुटुंबाचा व स्वत:चा उदरनिर्वाह सुरू होता. पण, आता हाताला काम नसल्यामुळे 'अंध व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा अंधार' आला आहे. शासनाकडून सुध्दा तुटपूंजी मदत मिळते. ती देखील वेळेवर मिळत नाही. परिणामी, आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो, त्यामुळे शासनाकडून संजय गांधी योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी मदत ही वाढवून मिळावी, अशी मागणी अंध बांधवांकडून होत आहे.
वर्षभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने कहर माजविलेला आहे. लाखाच्यावर कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर अनेकांनी कोरोनावर मात सुध्दा केली. पण, काहींना आपला जीव सुध्दा गमवावा लागला. दुसरीकडे अनेकांचा व्यवसाय ठप्प पडला. तर अनेकांचा रोजगारही गेला. जळगाव जिल्ह्यात ३० हजार दिव्यांग बांधव आहेत. मिळेल त्याठिकाणी काम करून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून अंध बांधवांच्या हाताला काम नाही. संजय गांधी योजनेच्या माध्यमातून हजार रूपये आर्थिक मदत मिळते. पण, ही तुटपूंजी रक्कम सुध्दा वेळेवर व नियमित मिळत नाही. त्यामुळे इतरांवर अवलंबून रहावे लागते. मागील वर्षी सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, या वर्षी बोटावर मोजक्याच इतक्या संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे काही प्रमाणात मदत मिळाली. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्याची प्रतिक्रिया अंध बांधवांनी दिली.
----------------------------
आधारही एकमेकांचाचं !
सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे दिव्यांग बांधवांना रेशनची मदत मिळाली. वडिलांचे गॅरेज आहे. पण, लॉकडाउनमुळे ते बंद आहे. आता ११ पर्यंत व्यवसायासाठी मुभा असल्यामुळे जे मिळेल त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. नुकतीच एका बँकेत क्लर्क म्हणून निवड झाली आहे.
- मंगेश शेवाळे
=========
नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहे. पण, मिळत नाही. लॉकडाउनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वडिल सुध्दा दिव्यांग आहेत. भाउ कंपनीत कामाला आहे. भावावर संपूर्ण कुटूंब अवलंबून आले. संजय गांधी योजनेतून मिळणारी रक्कम वेळेवर मिळत नाही. ती रक्कमही कमी आहे. त्यामुळे मदतीची रक्कम ही वाढवून मिळावी.
=========
अंधत्वाचे प्रमाण ७५ टक्के आहे. भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. दिवसात जितकी विक्री होईल, त्यातून संसाराचा गाडा हाकला जातो. पत्नीची साथ मिळत आहे. दरम्यान, दिव्यांग बांधवांसाठी शासनाने मदत जाहीर करावी.
- यशवंत सोनवणे
==========
- दोन जणांचा मृत्यू
कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. दिव्यांग बांधवांना सुध्दा कोरोनाची लागण होवून त्यातील दोन अंध बांधवांचा मृत्यू झाला. कैलास शिंपी व साहेबराव पगारे असे मयत झालेल्या अंध बांधवांची नावे आहेत. दोघं शिक्षकी पेशात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जिल्ह्यातील आणखी काही दिव्यांग बांधवांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्याबाबत नोंद नाही.
==========
मुंबई, पुणे महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांना उपजिविकेकरिता जी मदत लागते. ती मदत मंजूर केली व पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांना वस्तु घेवून दिल्या. याच प्रमाणे जळगाव मनपा व जिल्हा परिषदेने दिव्यांग बांधवांचे पुर्नवसन कसे केले जाईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
- मुकूंद गोसावी, अशासकीय सदस्य, पाच टक्के निधी समिती.