लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - संपूर्ण शहरात रस्ते, धूर, कचऱ्याचे ढीग अशा एकाहून एक समस्या आहेत. महापालिका प्रशासन या समस्या सोडविण्यात व नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आता मनपाच्या आवारात असलेल्या गोलाणी मार्केट व मनपाच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुंबल्या आहेत. तरीही मनपा प्रशासनाकडून किंवा आरोग्य विभागाकडून आतापर्यंत या भागातील स्वच्छतेकडे लक्षदेखील दिले गेलेले नाही. मनपाच्या दिव्याखालीच अंधार असताना, शहरातील विविध भागातील समस्या सोडविणे तर कठीणच आहे.
संपूर्ण जिल्ह्यात गोलाणी मार्केट हे मोबाइल म्हणून ओळखले जाते. या मार्केटमध्ये दररोज १० हजारांहून अधिक ग्राहक येत असतात, तसेच मार्केटमध्ये मोठ-मोठ्या मोबाइल कंपन्यांची दुकाने आहे. अनेक महत्त्वाची कार्यालये देखील या मार्केटमध्ये आहेत. मात्र, या मार्केटमध्ये व मार्केट परिसरात ज्या प्रकारे अस्वच्छता पसरली आहे. त्याप्रकारची अस्वच्छता शहरातील इतर कोणत्याही मार्केटमध्ये नसेल, त्यामुळे जे प्रशासन आपल्या आवारातीलच स्वच्छता करू शकत नाही तर ते प्रशासन शहरातील नागरिकांच्या काय समस्या मार्गी लावेल, अशी संतप्त प्रतिक्रिया गोलाणी मार्केटमधील व्यापारी, दुकानदार व मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.
मागच्या बाजूस भाजीपाला कुजला
गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस दररोज अनेक भाजीविक्रेते भाजीपाला फेकून देतात. तसेच मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून हा फेकलेला भाजीपाला उचललादेखील जात नाही. अनेक दिवस हा भाजीपाला या ठिकाणीच पडून राहतो. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. विशेष म्हणजे आठ-आठ दिवस मनपाकडून हा कचरा उचलला जात नाही, तसेच उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवरदेखील कोणतीही कारवाई केली जात नाही.
तळ मजल्यातील ‘तो’ स्वीमिंगपूल अजूनही कायमच
गोलाणी मार्केटच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचत असते, ही समस्या केवळ महिनाभरापूर्वीची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. नेहमी साचणाऱ्या गटारीच्या स्वीमिंग पूलबाबत शिवसेनेकडूनदेखील आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनाची दखलदेखील मनपा प्रशासनाने घेतलेली नाही. तळमजल्यात नेहमी पाणी साचत असल्याने अनेक साथीचे आजार देखील पसरण्याची भीती आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्येदेखील ग्राहक आता यायला तयार नाहीत.
सर्वच प्रवेशव्दारावर कचऱ्याचे ढीग
गोलाणी मार्केटमध्ये तीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी स्वच्छता मोहीम राबविली होती. तसेच नेहमी स्वच्छता राखण्यासाठी व्यापाऱ्यांवर जबाबदारी देखील सोपविली होती. मात्र, त्यानंतर काही महिन्यातच ही समस्या पुन्हा कायम झाली असून, गोलाणी मार्केटमध्ये येणाऱ्या सर्वच प्रवेशव्दारासमोर कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. शिवसेना कार्यालयाकडून मार्केटमध्ये येणाऱ्या प्रवेशासमोर तर नागरिक जाणे टाळतात इतकी भयंकर परिस्थिती आहे.
शौचालये की कचरा संकलन केंद्र
गोलाणी मार्केटमध्ये एकूण २८ स्वच्छतागृह आहेत. मात्र, त्यापैकी निम्मे स्वच्छतागृह बंद आहेत. त्यामध्ये या ठिकाणचे दुकानदार कचरा फेकून देतात. अनेक स्वच्छतागृहांमध्ये इतका कचरा आहे की आता या स्वच्छतागृहांमध्ये जाणे देखील कठीण झाले आहे. तर काही स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतागृह आता कचरा संकलन केंद्र झाले आहेत.