फोटो..
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे जीव गमावलेल्या रिक्षा चालकाला आपल्या मुलीनेच पीपीई किट परिधान करून अग्निडाग देऊन मुलाचे कर्तव्य बजावल्याची घटना नेरी नाका स्मशानभूमीत बुधवारी रात्री घडली.
रिधूरवाड्यातील रहिवासी दिनकर रामदास सोनवणे हे ममुराबाद-विदगाव मार्गावर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. त्यांना तीन मुली असून सर्व विवाहित आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर इकरा कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरू असतांना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांनी इतर प्रक्रिया पूर्ण केली, त्यानंतर मृतदेह सायंकाळी नेरीनाका स्मशानभूमीत नेण्यात आला.
सोनवणे यांना मुलगा नसल्याने अग्निडाग कोण देणार असा मुद्दा उपस्थित होताच. दुसऱ्या क्रमांकाची मुलगी राणी हिने जबाबदारी स्वीकारली व नगरसेवकांनीही त्यासाठी पुढाकार घेत मुलीचे मनोबल वाढविले.
दरम्यान मनपा कर्मचारी धनराज सपकाळे, शरीफ पिंजारी यांच्यासह सोनवणे यांची मुलगी राणीने पीपीई किट परिधान करून सर्व अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी पूर्ण करीत आपल्या पित्याला रात्री १० वाजता अग्निडाग दिला.