दहावी , बारावीच्या परीक्षांचे! सर्वत्र गुणांची, टक्केवारींची चर्चा अन मधूनच आत्महत्यांच्या बातम्या. ‘जीवन’सुरू होण्या अगोदरच संपण्याच्या (हृदयस्पर्शी) कथा, आक्रोश अन् घराघरात उभ्या राहणाऱ्या प्रश्नांच्या भिती ! सारं कसं ठरलेलं.. तेही दरवर्षी अन् समाजमन सुन्न करणारं ! अहो, आजची मुलं तशी हुशार आहेत, चुणचुणीत, स्मार्ट आहेत, धिटुकली आहेत. अभ्यासासह क्लासच, गुणांचं संकट, महत्वाकांक्षी माणसाचं, पालकाचं, संकट, खाण्यापिण्याचं अन् वागण्याबोलण्याचं संकट. यात सगळा दोष पालकांना वा शिक्षकांचा म्हणायचा का? पण, एक गोष्ट तेवढीच खरीयं हो, ती म्हणजे आमचा समाज ‘बालकेंद्री’ बनायलाच तयार नाहीये. लेकरू तीनचं होत नाही. तोच त्याच्यावर गणन-लेखन, वाचनाचं अन् गुणांचं ओझ, सोबत दप्तराचे व अपेक्षांचे ओझे. त्यात संवादाची बोंबाबोंब. म्हणायला सुजाण पालक पण धड ना मुलांशी संवाद ना घरच्यांशी ना इतर माणसांशी. परिणाम घरातलं वातावरण एकदम टाईट वा ‘गंभीर’! मुलांचे पालक, शिक्षक यांच्या देवघेवीतून, संवादातून घर आणि शाळा यांची सांगड घातली जावी, ही अपेक्षा. पण तिथेही ‘मला काम त्याची पडलीये’ ही (तीव्र) भावना खेळता खेळता, शिकता-शिकता मित्र मैत्रिणींसमवेत सहजीवन अनुभवता अनुभवता ‘पोरं’ वाढतात हेच मान्य नाही. ‘मुले जन्माला घालून जन्मदाते होणं सोपं आहे. पण त्या मुलांना समजूत घेत ‘पालक’ होणं अवघड. पण, आई-बाबा, मुलगा-मुलगी या चौकोनातला एकही कोन जुळल नाही तर ‘तो’ चौकोन पूर्ण होऊ शकत नाही, हे कुणी पटवून द्यावं? न्युक्लिअर फॅमिलीज....म्हणजे सुटी सुटी कुटुंबे कधी ‘एकत्र येत मुलांसाठी जगतील ? त्यांना एकमतानं वाढवतील? शेवटी दिवस निकालांचे आहेत हो... पालकमंडळी. तेव्हा, मुलांना तुमची आज खरच गरज आहे.-चंद्रकांत भंडारी, शालेय समन्वयक.
दिवस-‘निकालांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:14 PM