लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : तब्बल एका वर्षामध्ये मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात झालेले लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेच्या अंगावर शहारा आणणारा ठरलेला आहे. अतिशय कडक निर्बंध आणि विविध अशा अडचणींना तोंड देत सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले होते. वर्षभरानंतर मुक्ताईनगर तालुक्यात एकूण २३३० एवढी रुग्ण संख्या झाली असून, २१६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून, अजूनही १२८ रुग्ण मुक्ताईनगर कोरडे रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ४० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
तीव्र लॉकडाऊनच्या काळामध्ये मुक्ताईनगर शहरात विविध व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, वंदे मातरम ग्रुप व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण शहरभर व पायी येणाऱ्या बाहेरील राज्यातील प्रवाशांसाठी तसेच विविध रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत अशी शिजवून अन्न खाऊ घालण्याची योजना व केलेली व्यवस्था हे एक वैशिष्ट्य ठरले आहे. मागील वर्षी कोरोनाची असलेली भयंकर भीती गेल्या वर्षभरात मात्र निवळून गेली असून सर्वसामान्य जनता आपल्या उद्योग व्यवसायाला लागलेली आहे. आजही विविध निर्बंध असले तरी भीती मात्र कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.