जळगाव- शहरातील नवीन बी़जे़ मार्केट परिसरातील कचरा कुंडीत काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी शेख रियाज शेख मुनाफ यांच्या तक्रारीविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नवीन बी.जे. मार्केट परीसरात असलेल्या कचरा कुंडी जवळ काही कचरा वेचणाऱ्या मुलांची वर्दळ असते. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कचरा वेचणाºया मुलांना एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मृत नवजात अर्भक मिळून आले. त्याठिकाणी गर्दी झाल्यानंतर जवळचं साक्षी आॅटो गॅरेजजवळ पेपर वाचत असलेले गॅरेज मालक शेख रियाज शेख मुनाफ आणि स्वच्छता कर्मचारी रवी हंसराज यांनी गर्दी का जमली आहे, हे पाहण्यासाठी गेले तर त्यांना मृत अर्भक पिशवीत पडून असल्याचा प्रकार दिसून आला. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक एम.ए.वाघमारे, नीलेश पाटील, रामेश्वर ताठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात या अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.दरम्यान, अर्भकांना फेकून देणाºया मातेविरूध्द शेख रियाज शेख मुनाफ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर अर्भक हे स्त्री जातीचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत समोर आले़