मृत झालेल्या देवकाबाई यांचे सासर भोकर, ता.जळगाव तर माहेर कानळदा आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसच त्या पतीसोबत होत्या. नंतर माहेरीच होत्या. त्यांना मूलबाळ नाही. त्या एकट्याच रहात होत्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्वच नातेवाइकांनी बसस्थानक व रुग्णालय गाठले. महाविद्यालयात आलेली बहिणीच्या मुलाची मुलगी हर्षदा सोनवणे हिने आक्रोश करणाऱ्या लीलाबाई यांना सावरले. तेथून त्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गेल्या.
पुढच्या चाकात आल्याने मृत्यू
देवकाबाई या बसच्या पुढच्या उजव्या चाकाखाली आल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्या बससाठी धावपळ करून गेल्या, ती बस दुसरीच असल्याचे समजल्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर येत असताना फलटावर लागलेली मनमाड-भुसावळ बस (क्र.एमएम १४- बीटी ०५६४) भुसावळसाठी जायला निघाली. वळण घेत असताना वृध्देकडे चालकाचे लक्ष नव्हते, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.
चालकाचे निलंबन होणार
या घटनेबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, चालकाला तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. त्याशिवाय महामंडळाच्या नियमानुसार मयत वृध्देच्या नातेवाइकांना आर्थिक मदत मिळू शकते. पुढे न्यायालयात दोष सिध्द झाला तर चालकाला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकते. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चालकाला अटक करण्यात आली.