जळगाव : बीएचआर संस्थेतील ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात अवसायक जितेंद्र कंडारे याला गुरुवारी पुणे विशेष न्यायालयाने म्हणणे मांडण्यासाठी २८ एप्रिल ही शेवटची तारीख दिली आहे. कंडारे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आरोपीपक्षाकडून सतत तारीख मागितली जात असल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेत यापुढे अशी संधी देऊ नये अशी विनंती न्यायालयाला केली.
पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीणमधील एक अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबद्दल बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए. महावीर जैन, धरम सांखला, सुजित वाणी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. जितेंद्र कंडारेने पुणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपी पक्ष बाजू मांडत नसेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने २८ एप्रिल ही शेवटची तारीख दिली.