जळगाव : कोविड रुग्णालयाच्या स्वचछतागृहाकडे जात असताना चक्कर येऊन पडल्याने आणखी एका मृत्यू झाल्याची घटना शनिवार २७ रोजी पहाटे घडली. यापूर्वीही अशाच प्रकारे तीन जणांचे मृत्यू झाले आहेत तर एका वृद्ध महिलेचा मृतदेहच शौचालयात आढळून आला होता.शौचालयाला जात असताना हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी रुग्णालयाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी याबाबत अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांची भेटही घेतली़अमळनेर तालुक्यातील एका ४६ वर्षीय प्रौढाला १९ जून रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दोन दिवसांनी त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला़ मात्र, त्यांना अन्य त्रास असल्याने त्यांना रुग्णालयातच कक्ष दहा मध्ये दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात २४ जून रोजी हलविण्यात आले होते़ त्या ठिकाणी तब्ब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना पुन्हा कक्ष ६ मध्ये दाखल करण्यात आले़ मात्र, त्रास वाढल्याने या ठिकाणी त्यांचा २७ रोजी पहाटे मृत्यू झाला़ असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे़ या कोविड रुग्णालयात स्वचछतागृहाकडे जात असताना यापूर्वी तीन जणांचे मृत्यू झाले आहेत. तसेच एका वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आला होता.मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा उठतोय जीवावरआॅक्सिजन लावण्यात आलेल्या रुग्णांना नैसर्गिक विधीसाठी पाच ते दहा मिनिटे उठून जावे लागत असल्याने हा प्रकार जीवावर उठण्याचा धोका अधिक आहे़ अशा स्थितीत अनेक रुग्ण असे आॅक्सिजन काढून स्वच्छतागृहात चालत जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले होते़ सद्य स्थितीत १५० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत, मात्र, त्यांना लागणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ रुग्णालयाकडे नाही, त्यामुळे या रुग्णांना उठूनच स्वच्छतागृहात जावे लागते़ मालती नेहते या वृद्ध महिलेच्या बाबतीतही हाच प्रकार घडल्याा संशय व्यक्त करण्यात आला होता़ जागेवरच या बाबी मिळाल्या तर आॅक्सिजन काढायची गरज पडणार नाही व रुग्ण दगावणार नाही, असा एक सूर आता उमटत आहे़रुग्ण निगेटीव्ह असला तरी त्याला कोविडची लक्षणे असल्यास आपण त्याला डिस्चार्ज देत नाही़ संबधित रुग्णाला मधुमेह होता़ आम्ही गंभीर रुग्णांसाठी बेडपॅनची व्यवस्था केलेली आहे़-डॉ़ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.
स्वच्छतागृहाकडे जाताना पुन्हा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:05 PM