मेहुणबारे, ता.चाळीसगाव : सासरी कितीही सोन्याचा धूर निघू लागला तरी बहिणीला माहेरची आस असते. अशीच आस उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील बहिणीला आजच्या भाऊबिजेनिमित्त घरी भाऊ येणार म्हणून लागली होती. मात्र, आपल्या बहिणीकडे जाणाºया भावाचा २९ रोजी दुपारी चारच्या सुमारास चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील आडगावजवळ अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.याबाबत माहिती अशी, सोनज टाकळी (ता. मालेगाव) येथील रहिवासी मनोज शेवाळे (वय ३०) हा तरुण आपल्या दुचाकीने (एमएच-४१-५७२०) उंबरखेड (ता.चाळीसगाव) येथील बहिणीकडे भाऊबिजेनिमित्त जाण्यासाठी निघाला. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरून जात असताना आडगाव ते हॉटेल चंद्रा दरम्यान मालेगावकडे जाणाºया कारने (एमएच-१९-बीयू-५२७८) त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की अपघातात मनोज शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी कमलेश राजपूत व मनोहर पाटील यांना पाठवले. मृतदेह विच्छेदन करण्यासाठी चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात संदीप शेवाळे यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.बहिणीने फोडला टाहोउंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील वाल्मीक महाले यांचा मनोज शेवाळे हा लहान शालक होता. प्राप्त माहितीनुसार, मनोज २९ रोजी दुपारी देवघट (ता.मालेगाव) येथील मोठ्या बहिणीकडे औक्षण करून उंबरखेडे येथे जाण्यासाठी निघाला. दुपारी साडेचारच्या सुमारास मनोजवर काळाने झडप घालून बहिणीपासून त्याला हिरावून नेले. या अपघाताची माहिती उंबरखेडे येथील बहिणीला समजताच तिने अपघातस्थळी धाव घेतली. भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच बहिणीने एकच टाहो फोडला. अरे दादा, कुठे गेला.. काय झाले... हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते. मनोज हा आपल्या दोन्ही बहिणींचा लहान भाऊ होता. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. भाऊबिजेच्या दिवशी ही घटना घडल्याने सोनज टाकळी व उंबरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.
भाऊबिजेसाठी बहिणीकडे जाणाऱ्या भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 4:23 PM