वरखेडी ता.पाचोरा- पाचोरा तालुक्यातील वरखेडी, भोकरी, लोहारी गावांमध्ये मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून या गावांमध्ये बाहेरगावाहून कुत्रे आणून सोडण्याचे प्रकार वाढले आहे़ मात्र, हा प्रकार ग्रामस्थांच्या जीवावर बेतत असून लोहारी येथील फैजान जमिल काकर (वय-१४) या मुलाला आपला जीवन गमवावा लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.लोहारी गावात २६ आॅगस्ट रोजी सायंकाळी आयमन मुश्ताक काकर ही सहा वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना तिच्यावर गावातील मोकाट कुत्र्याने हल्ला करित कपाळावर चावा घेतला़ या पिसाळलेल्या कुत्र्याने आपला मोर्चा दुसरीकडे वळवत फैजान जमील काकर हा सुध्दा अंगणात खेळत असताना त्याच्यावर हल्ला चढवून त्याच्या चेहऱ्यावर तीन ते चार ठिकाणी चावा घेतला. लहान भावावर हल्ला होत असताना पाहताच तहेजीन रज्जाक काकर (वय-१७) ही आपल्या भावाला पिसाळलेल्या कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेली असता या कुत्र्याने तिच्यावर देखील हल्ला चढविला़ तर तिच्या हाताला सुध्दा चावा घेतला़ हे बघून मुलांचे वडील जमील रज्जाक काकर हे देखील आपल्या मुलांना या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी गेले असताना त्यांनाही कुत्र्याने चावा घेतला़ यात तेही जखमी झाले़नागरिक धावले मदतीलातिघा- चौघांवर हल्ला झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन या सर्वांना या कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर या जखमींना पाचोरा येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. फैजानच्या चेहºयावर चावा घेतलेला असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात रवाना केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे फैजान याला मुंबई येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले.अखेर प्राणज्योत मालवली ़़़दरम्यान, रूग्णालयात उपचार घेत असताना फैजार याचा १९ सप्टेंबर, गुरूवार रोजी मृत्यू झाला़ यामुळे यामुळे लोहारीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच आयमन मुश्ताक काकर, जमील रज्जाक काकर व तहेजीन जमील काकर यांच्यावर पुढील सहा महिन्यातपर्यंत जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली.वरखेडी येथे मोकाट कुत्र्याचा महिलेवर हल्लावरखेडी येथे मागील आठवड्यात सुपडाबाई बाळू कुंभार (वय-४०, वरखेडी, ता़ पाचोरा) ही महिला शेतात एकटी काम करत असताना त्यांच्या आठ ते नऊ मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला़हा प्रकार आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन या महिलेला कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली़ या महिलेच्या शरीराव अनेक ठिकाणी ओरबडले जाऊन जखमा झाल्या आहेत़ या महिलेवर वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते. मागील वर्षी देखील एका शाळकरी मुलीवर सकाळी सकाळीच आठ ते दहा कुत्र्यांनी हल्ला चढविला होता. दिवसेंदिवस या मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यात बाहेरगावाहून आणलेले कुत्रे गावात सोडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्या आणखीन भर पडत आहेत़ त्यामुळे गावच्या ग्रामपंचायतींनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.