लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण स्थिर असले तरी कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात तब्बल २२ जणांचा कोरोनाने बळी गेला. शहरातीर ८ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यात एका ३० वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे. तर शहरातील ३२ वर्षांच्या युवकाचाही मृत्यू झाला आाहे. महिला आणि कमी वयाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबळींचा आकडा १९९८ एवढा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. बुधवारी एकाच दिवसात जळगाव शहरात कोरोनाने ८ जणांचा बळी गेला आहे. त्यात ३२ वर्षांच्या पुरुषाचा देखील समावेश आहे. हा आजच्या दिवसातील सर्वात कमी वयाचा कोरोना बळी आहे. तरुणांचा देखील कोरोनाने बळी जाण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने जळगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
जळगाव शहरात मृत्यू झालेल्यांमध्ये ७ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर भुसावळ आणि चोपडा तालुक्यात प्रत्येकी ४ तर यावल, पाचोरा, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण २२ मृत्यूंपैकी ८ महिलांचा मृत्यू झाला.
बुधवारी ११४२ नवे रुग्ण आढळून आले तर ११३४ जण बरे झाले त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ११८ एवढी झाली आहे.
जामनेरला कोरोना रुग्णांच्या संख्येत स्फोट
बुधवारी जामनेर तालुक्यात तब्बल २८७ नवे बाधित सापडले आहेत. त्यात ॲन्टिजेन चाचणीत तब्बल २५५ नवे बाधित सापडले आहेत. तर रावेरला १०४, भुसावळला ११४, चोपड्यात १०४ नवे रुग्ण आहेत. जळगाव शहरात देखील १८९ नवे बाधित आहेत. जळगाव ग्रामीणमध्येदेखील ३९ नवे रुग्ण आहेत.
१५ हजाराच्या वर झाल्या चाचण्या
बुधवारी एकाच दिवसात १५,१०५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १ हजार ९५४ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तर १३ हजार १५१ जणांची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट खाली आला आहे.