भास्कर पाटील ।महिंदळे,ता.भडगाव : आपल्या बरोबरीने खांद्याला खांदा लावत शेतात राबणाºया मोती नावाच्या जिवाभावाच्या मैतराला तो थकला म्हणून कसायाच्या दारात उभा न करता त्याला आपल्या दावणीतल्या खुट्यावरच भाग्याचे मरण येऊ दिले. व त्याच्या मृत्यूनंतर वाजतगाजत अंतीम सोहळा साजरा करीत मैतरा तुज्यासाठी केला हा अट्टाहास...! ची प्रचीती देत त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. जणू काही त्याच्या उपकाराची परतफेडच. बैल पोळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतांनाच , त्याची आठवण मात्र या कुटुंबाला चिरंतन राहील.येथील शेतकरी धनसिंग रामलाल परदेशी यांना नातलगाकडून पाळण्यासाठी लहान वासरू मिळाले होते. ते वासरू लहानपणापासून गुणी व देखणे होते. त्यांनीही त्याला चांगला खुराक देऊन वाढवले. त्यांनी त्याचे नाव हौसेने मोती, ठेवले. मोतीही नावाप्रमाने गेली २५ वर्षे मोत्यासारखा चमकत राहीला. घरातील सदस्या प्रमाणे त्याचे खान, पान, खुराक अशी त्यांनी दखरेख ठेवली. त्याला वेळेवर धुणे, खरारा करीत मायेने अंगावर हात फिरवणे असा लळा त्यांनी लावला होता. आपल्या धन्याचे ऋण तो आपल्या दुसºया जोडीदाराबरोबर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिनही ऋतुत राबत फेडत होता. अंगात रग असली म्हणजे जितरब उगारते. मोती मात्र याला अपवाद ठरला. याने ही रग आपल्या राबण्यात ओतली होती. घरातील लहाणग्यापासुन ते मोठ्यांपर्यत कुणालाही २५ वर्षात ईजा पोहोचवली नाही.दोन वर्षे मोतीला दिला आरामबरोबरीचे चार बैल बदललेत पण मोत्याने सलग २० ते २५ वर्ष बैल गाडी, औताच्या जु (दुशेर) ला लावलेला खांदा तो (धकने) उत्तरोत्तर काढला नाही. महादेवाचा हा नंदी आपल्या पावलानं सुबत्ता आणीत राबला. शेतातुन मोती उगवण्यात मोत्या बैलाने कोणतीच कसर ठेवली नाही..निसर्ग नियमानुसार तो थकला गात्र शिथील झालीत. मालकानं त्याला विश्रांती देण्याचे ठरवले. मागील दोन वषार्पासून त्याला कामाला न जुंपता आपल्या घरातील सदस्या प्रमाणे आजतागायत त्याच्या खानपानाची व औषध उपचाराची व्यवस्था ठेवली.दोन -तीन वर्षाच्या लागोपाठ दुष्काळात चारा टंचाई मोठया प्रमाणात होती. त्याला विकण्याचा अनेकांनी सल्ला दिला.मात्र जिवाभावाच्या जितरबाला कसायाला विकण्याचा विचारही कधी मनात आणला नाही. या काळात तर रिकाम्या माणसाला खाऊ घालणेही जड होते परंतु मोती बैलानं गेली २५ वर्षे आपली सेवा केली. आता आपण त्याची सेवा करायची असे ठरवत त्यांनी दुष्काळातही त्याला चाºयाची कमी पडू दिली नाही. काल त्यानं आळीपाळीनं आपला मालक व सभोवतालच्या शेताकडं शेवटची नजर टाकत आपली मान टाकली. त्याची प्राणजोत मालवली अन् घरातील सदस्य गमवल्याचे दुख: मालकाला झाले.असाही मरण सोहळामोतीच्या निधनानंतर घरातील सदस्य सतीश परदेशी, कैलास परदेशी, कर्तारसिंग परदेशी, प्रकाश परदेशी व कुटुंबातील मंडळींनी त्याची आंघोळ घालून विधिवत पुजाअर्चा केली. नवा कपडा अंगावर टाकून व वाजतगाजत बैलगाडीच्या सहाय्याने गेली २५ वर्षे ज्या शेतात मोती राबला त्या शेतात खड्डा खोदून दफन विधी करून शेवटचा निरोप दिला.
मोती बैलाच्या वाट्याला आले भाग्याचे मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:42 PM