लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आधी मोठा मुलगा आणि नंतर वडील असे एकाच घरातील एका पाठोपाठ दोन बळी कोरोनाने घेतले. त्यामुळे रामेश्वर कॉलनीतील पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईला शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे डॉ. नीलेश लक्ष्मण पाटील (वय ३७) आणि त्यांचे सेवानिवृत्त वडील लक्ष्मण दौलत पाटील (वय ६२) यांचा नाशिक येथे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
१२ दिवसांपूर्वी नीलेश पाटील यांना खोपोली, जि. रायगड येथेच त्यांच्या घरी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. घरातील कर्ता पुरुष पण तेथे अडकू नये म्हणून लक्ष्मण पाटील यांनी आपला दुसरा मुलगा जितेंद्र यांना नीलेश यांना नाशिक येथे आणण्यासाठी पाठवले. जितेंद्र हे नीलेश यांना घेऊन नाशिकला आले. त्यांना मित्रांच्या मदतीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संसर्ग पसरतच होता. त्याच काळात नीलेश यांचे वडील लक्ष्मण पाटील यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे त्यांनादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी चार एप्रिलला डॉ. नीलेश यांनी अखेरचा श्वास घेतला. तर दुसऱ्याच दिवशी सोमवारी पाच एप्रिलला लक्ष्मण पाटील यांनीही अखेरचा श्वास घेतला. नीलेश यांच्या मागे पत्नी, मुलगा सम्राट, मुलगी तेजस्विनी असा परिवार आहे. त्यांचे दोन भाऊ राकेश आणि जितेंद्र, आई असा परिवार आहे. नीलेश यांनी जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी.देखील केली होती. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत तोच त्यांचे पिता लक्ष्मण पाटील यांनीही अखेरचा श्वास घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लक्ष्मण पाटील हे जळगाव दूध फेडरेशनचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.