तोंडापूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या शेंगोळा गावातील पाझर तलावात शेकडो मासे रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. तडफडून मृत्युमुखी पडलेल्या या माशांवर विषप्रयोग केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शेंगोळा गावातील वजीर दगडू तडवी, कबीर नासिर तडवी, अफसर गुलाब तडवी, शेनफड भावडू तडवी हे ग्रामपंचायत हद्दीतील पाझर तलावात मासेपालन करतात. ठेकेदारी पद्धतीने हे मासेपालन केले जाते. यावेळीही त्यांनी गावाजवळील पाझर तलावात सुमारे ८० डबे मच्छी बीज सोडले होते. रविवारी सकाळी त्यांना तलावातील मासे तडफडून मरताना आढळले. हे पाहून त्यांना धक्का बसला आणि त्यांनी ही घटना तातडीने पोलिसांना कळविली. पोलिसांनी या दखल घेतली. घटनास्थळावरून तलावातील पाण्याचे नमुने घेतले. पुढील तपासणीसाठी ते पाठविण्यात आले आहे. अज्ञात माथेफिरुने विषप्रयोग केल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेमुळे या मच्छीमार बांधवांचे सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. तपास करुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती मच्छीमार बांधवांनी केली आहे.
शेंगोळा गावाजवळील पाझर तलावात माशांचा तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 2:59 PM
शेंगोळा गावातील पाझर तलावात शेकडो मासे रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले.
ठळक मुद्देविषप्रयोग केल्याचा प्राथमिक अंदाजअज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल