कोरोनाचा परिणाम : कमी मनुष्यबळामुळे कामाचा जादा ताण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत, दिवसेंदिवस बाधितांचे प्रमाण वाढत आहे, तसे कोरोनाचा मृत्युदरही वाढत आहे. या कोरोनाबाधित मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत नेण्याची जबाबदारी शववाहिकेवरील चालकांना पार पाडावी लागत आहे. कोरोनापासून बचावासाठी या चालकांनी योग्य ती खबरदारी घेतली असली, तरी त्यांना सध्या कोरोनाच्या भयावह वातावरणात जीव धोक्यात घालूनच जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात दररोज २० ते २२ कोरोनाबधितांचे मुत्यू होत आहेत. यामुळे स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. रुग्णालयात कधी तासाला एक-दोन, तर कधी एकाच वेळी चार ते पाच कोरोनाबधित मृतदेह बाहेर निघत असल्याने शववाहिकेवरील चालकांना मृतदेह नेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळपासून सुरू झालेली कोरोनाबाधित मृतदेहांची ने-आण रात्री उशिरापर्यंत होत असल्याचे या चालकांनी सांगितले. तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण असून, साप्ताहिक सुट्ट्याही रद्द असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शववाहिकेत तांत्रिक बिघाड झाल्यास गॅरेज मालकांकडून कोरोनाच्या भीतीमुळे शववाहिका दुरुस्ती केली जात नाही. अनेकजण नकार दर्शवितात. त्यामुळे शववाहिकेच्या दुरुस्तीसाठी खूप फिरावे लागत असल्याचेही चालकांनी सांगितले.
इन्फो :
एकूण रुग्णवाहिका- १३६
कोविडसाठीचा रुग्णवाहिका- १३६
चालक संख्या- १७१
नॉन कोविडसाठी रुग्णवाहिका- १३६
चालक संख्या- १३६
इन्फो :
शववाहिकेवरील चालक असल्याने सुरुवातीला थोडी भीती होती. मात्र, योग्य ती खबरदारी घेऊन गेल्या वर्षापासून काम सुरूच आहे. जीएमसीमध्ये एकच शववाहिका आणि मी एकच चालक असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यामुळे खूप धावपळ होते.
चंद्रकांत पाटील, चालक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने दररोज यावेच लागते. सद्य:स्थितीला शववाहिकेमध्ये बिघाड झाल्यास तिच्या दुरुस्तीसाठी गॅरेजवाले नकार देतात. त्यामुळे आमचे काम अडून पडते. यामुळे दुरुस्तीसाठी खूप फिरावे लागते.
कवी कासार, चालक
इन्फो :
कोरोनाबाधित मृतदेहांना स्मशानभूमीत घेऊन जाण्याचे दररोजचे काम असल्यामुळे मनात थोडी भीती असतेच. कोरोनाचा आपल्याला व परिवाराला त्रास होणार नाही, याची खूप काळजी घेत असतो. सध्या तर कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. यामुळे कधी-कधी घरी जायला उशीर होतो.
छोटू पाटील, चालक