आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२० : बांधकामास्थळी इमारतीच्या तिस-या मजल्यावर प्लास्टर करीत असताना लाकडी दांडी तुटल्याने खाली कोसळून सुपडू दिलीप सपकाळे (वय २८ रा. हुडकोे, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शनिपेठेतील मायक्का मंदिरासमोर घडली. लाकडी दांडी तुटल्यामुळे सुपडू खाली लोखंडी जाळीवर पडला. डोक्याला मार लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मायक्का मंदिरासमोर लक्ष्मण माधव चौधरी यांच्या मालकीचे बांधकाम सुरु आहे. भगवान चंगू मिस्तरी यांनी बांधकामाचा ठेका घेतला आहे. सुपडू त्यांच्याकडे कामाला आलेला होता. तिसºया मजल्यावर बाहेरुन प्लास्टर करण्याचे काम सुरु असल्याने लाकडी पालकाची दांडी तुटल्याने सुपडू थेट खाली कोसळून लोखंडी जाळीवर पडला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. कामावरील अन्य मजुरांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
कामाचा पहिलाच दिवससुपडू हा पंधरा दिवसापासून घरीच होता. मंगळवारी त्याचा कामाचा पहिलाच दिवस होता. आई लताबाई यांनी त्याचा सकाळीच जेवणाचा डबा तयार करुन दिला होता. त्यानंतर दोन तासाने त्याच्या मृत्यूचीच बातमी धडकली. जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहताच आईने आक्रोश केला. पाच वर्षाचा लहान भाऊ सुनील, आई व पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले होते.