आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,७: मातीच्या ढिगा-याखाली दबल्याने रवींद्र अशोक अहिरे (वय ३२ रा.पिंपळकोठा प्र.चा.ता.एरंडोल) या तरुण मजुराचा मृत्यू तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता निमखेडी शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपळकोठा प्र.चा.येथील रवींद्र अहिरे, एकनाथ अर्जुन साळुंखे, रमेश आधार साळुंखे यांच्यासह अन्य तीन असे सहा मजुर मंगळवारी सकाळी ९ वाजता निमखेडी शिवारात कामाला आले होते. नदीपात्राला लागून असलेल्या ठिकाणी माती काढत असताना अचानक वरील ढिगारा कोसळला. त्यात रवींद्र अहिरे हा दबला गेला तर एकनाथ व रमेश यांना किरकोळ मार लागला. रवींद्रचा जागेवरच मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयात आक्रोश
मातीच्या ढिगाºयाखाली दबलेल्या रवींद्र याला सहका-यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. रवींद्रच्या मृत्यूची बातमी कळताच गावकºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्याचा मृतदेह पाहून महिला नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. रवींद्र ज्या मालकाकडे कामाला होता त्याला तातडीने येथे आणून कारवाई करा म्हणून नातेवाईक संतप्त झाले होते. पोलिसांनी धीर देत त्यांची समजूत घातली. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक निरीक्षक सचिन बागुल, जितेंद्र पाटील, प्रफुल्ला धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावर एकही वाहन आढळून आले नाही. घटनास्थळाचा पंचनामा करुन जिल्हा रुग्णालयातही मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.