अमित महाबळ/ जळगाव : शिरसोली येथील जंगलात असलेल्या एका शेतातील विहिरीत पडून बिबट्याचामृत्यू झाल्यानंतर भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून उपवनसंरक्षक प्रवीण ए.,सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव प्रादेशिक नितीन बोरकर व वन कर्मचारी यांनी जंगलात गस्त घालत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शिरसोली येथील बाह्मणे शिवारातील सुकलाल आंबटकर यांच्या शेतातील विहिरीला कठडे नसून, अंधार असल्याने पाच महिने वयाच्या बिबट्याचा या विहिरीत पडून मृत्यू झाला. जंगलात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जंगलात फिरून कठडे नसलेल्या विहिरी व बिबट्याचा वावर असलेल्या भागाची पहाणी केली, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. विहिरींना कठडे करून घेण्याचे आवाहन करत बिबट्या व इतर हिंस्र प्राण्यांपासून आपला बचाव कसा करावा यावर मार्गदर्शन केले. यावेळी वन कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जंगल पिंजून काढला. वन अधिकारी, वन कर्मचारी यांच्यासह सरपंच हिलाल भिल, उपसरपंच शशिकांत आस्वार, रामकृष्ण काटोले, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी हातात काठी व बॅटरी ठेवावी. एकट्याने न जाता दोन, तीन जणांनी मिळून एकत्र जावे. रस्त्याने गुपचूप न जाता बोलत व आवाज करत जावे. बिबट्या दिसल्यास आरडाओरडा करा, म्हणजे बिबट्या पळून जाईल, असे आवाहन वन अधिकारी नितीन बोरकर यांनी केले आहे.