जळगाव : बिलासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मृतदेह अडवून धरल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे नवीन नाही. जिल्हा पोलीस दलातील एका सहायक फौजदाराच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण पोलीस प्लॅनमध्ये होते. रुग्णालयाकडून मिळालेल्या या वागणुकीबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिल्हा पोलीस दलातील हवालदार श्रीराम रामदास वानखेडे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांची शनिवारी अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याच डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना मोठे बंधू तथा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेतील सहायक फौजदार शांताराम वानखेडे यांनी नाशिकच्या पोलीस प्लॅन असलेल्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काही वेळातच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मृतदेह ताब्यात मिळावा म्हणून विनंती केली असता रुग्णालयाने पोलीस प्लॅनमधील प्रकरण असले तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळेल तेव्हाच मृतदेह देता येईल, अशी भूमिका घेतली. शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने सोमवारी महासंचालक कार्यालयातून मंजुरी मिळेल, तोपर्यंत अंत्यसंस्कार कसे रोखता येतील असे नातेवाईकांनी सांगितल्यावरही रुग्णालय आपल्या भूमिकेवर ठाम होते.
जळगावला स्थानिक गुन्हे शाखेत निरीक्षक असलेले व सध्या नाशिकलाच कार्यरत बापू रोहोम यांनी पहाटे तीन वाजता रुग्णालय गाठले. प्रकरणाला मंजुरी मिळण्याची हमी देत प्रशासनाकडे मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. उलट रुग्णालयाने मृताच्या पत्नीकडे धनादेशाची मागणी करत तुम्हाला नियम कळतात का?, संपूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय मृतदेहाचा ताबा मिळणाच नाही, असे ठणकावून सांगण्यात आले.
कोरोना योद्ध्याची झाली मदतकाही केल्या रुग्णालय प्रशासन ऐकत नाही, दुसरीकडे मृतदेह आयसीयुत गुंडाळून एका बाजुला ठेवलेला..दोन दिवसांची मृतदेहाचा ताबा मिळाला तर त्याची जास्तच अवहेलना होईल म्हणून काही पोलिसांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष अनिल भडांगे यांना कल्पना दिली. त्यांनी पहाटे साडे पाच वाजता प्रशासनाशी मध्यस्थी घडवून आणली, त्यानंतर रोहोम व इतर पोलिसांनी बिलाची हमी देत कोऱ्या कागदावर सह्या केल्या, तेव्हा कुठे मृतदेहाचा ताबा मिळाला. वानखेडे रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी सायंकाळी त्यांच्यावर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.