लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची मृत्यूसंख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यात अन्य व्याधी असलेल्या १ हजार २९ रुग्णांचा समावेश आहे. यातही ५० किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या रुग्णांची यात संख्या अधिक आहे. अन्य व्याधी असलेल्यांना कोरोनाचा अधिक धोका असून त्यामुळे त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले होते.
जिल्ह्यात रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र, मृत्यूची संख्या अद्याप वीसपेक्षा अधिकच असल्याने चिंता कायम आहे. मध्यंतरी कमी वयाच्या रुग्णांचेही मृत्यू झाले. मात्र हे प्रमाण अन्य व्याधी किंवा वृद्धांपेक्षा कमी आहे.
लवकर निदानाने कोरोना बरा होता
कोरोनाचे वेळेवर निदान होऊन त्याचे तातडीने उपचार सुरू झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. असेच आजपर्यंतच निरीक्षण असल्याचे डॉक्टर सांगतात. यात अनेक ७० किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे, मधुमेह असलेले रुग्णांनीही कोरोनावर मात केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने तपासणी हे यावरचे एकप्रकारचे मोठे उपचारच असल्याचे सांगण्यात येते.
अन्य व्याधीत मधुमेहाचे रुग्ण अधिक
गेल्या वर्षीच्या मृत्यू परिक्षणात एकूण मृत्यूपैकी ५० टक्के मृत्यू हे मधुमेह असलेल्या रुग्णांचे झाले होते. यंदाही ते प्रमाण सारखेच आहे. अन्य व्याधी अर्थात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, किडनीचे आजार, यकृताचे आजार अशा रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी असते. त्यामुळे त्यांना लागण लवकर होणे शिवाय त्यांचे यात गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असते, असे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ.भाऊराव नाखले यांनी सांगितले.
कोरोनाचे मृत्यू
एकूण २०५८
५० किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील मृत्यू : १७०३
अन्य व्याधी असलेले रुग्ण : १०२९
५० पेक्षा कमी वयोगटातील मृत्यू ३५५
म्युटेशन हे गंभीर
कोरोना विषाणूत झालेला जनुकिय बदल हा गंभीर असून यामुळेच तरूणांमध्येही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यात धुम्रपान, मद्यपान अशी व्यसने अधिक धोकादायक ठरत आहे. शिवाय तरूण पुरेशी काळजी घेत नाही. मात्र, काळजी घेणारे, व्यसन नसलेले अशा सामान्य तरूणांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काळजी घेणे व आपल्याला काहीच होणार नाही, हा गैरसमज, बेफिकीरी टाळणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख, मेडिसीन विभाग
तालुका निहाय मृत्यू
जळगाव : ५९१
भुसावळ : २८०
चोपडा : १४८
रावेर १३४
अमळनेर : १३१
जामनेर १०९
यावल १०४
चाळीसगाव १०३
पाचोरा १००
पारोळ्याचा मृत्यूदर सर्वात कमी
पारोळा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ४१५९ असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर बघितला असता ०.८८ टक्के मृत्यूदर पारोळा तालुक्याचा असून हा जिल्ह्यात सर्व तालुक्यांपेक्षा कमी आहे.