लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्युदर हा २.५ टक्केच्या आसपास होता. मात्र १६ फेब्रुवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर हाच मृत्युदर आता १.७ टक्केच्या जवळ आला आहे. आणि १५ फेब्रुवारीपासून रुग्ण आणि झालेले मृत्यू यांचा दर पाहिला तर तो फक्त १ टक्के आला आहे. मृत्यूचे प्रमाण घसरले आहे. तसेच ज्यांनी लस घेतली आहे. त्यांच्यात देखील कोरोनाची तीव्र लक्षणे किंवा गंभीर धोका नाही. लस घेतल्यावरदेखील ज्यांना कोविड १९ झाला आहे. त्यांना सौम्य लक्षणेच आढळून आली आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक को-व्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी दिल्या जात आहेत. जिल्हाभरात विविध केंद्रांवर ४५ वर्षावरील व्यक्तींना ही लस दिली जात आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात गुरुवारपर्यंत २ लाख १७ हजार ६१७ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. तर ३५ हजार ९०२ जणांनी लसीचा दुसरा डोसदेखील घेतला आहे.
लस घेतल्यावर काहींना ताप येणे, तसेच अन्य किरकोळ समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र त्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
लस महत्त्वाचीच. मृत्यूचा धोका कमी
जिल्ह्यात लस घेतल्यावरदेखील कोरोना झाला, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र लस घेतल्यानंतर कोरोनाच्या तीव्रतेचे प्रमाण कमी होते. त्यानंतर रुग्णाच्या मृत्यूचा धोकादेखील कमी होतो. तसेच लस घेतल्यावरही मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही.
महिनाभरापूर्वी पॉझिटिव्हिटी होती १२ टक्के
१६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली तर १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात १० ते १२ टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. केलेल्या चाचण्या आणि आढळून आलेले रुग्ण यांच्यानुसार हा पॉझिटिव्हिटी रेट काढला जातो.
कोट - जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. तर १५ फेब्रुवारीपासूनच रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली आहे. असे असले तरी पहिल्या टप्प्यात जवळपास २.५ टक्के मृत्युदर होता. आता १५ फेब्रुवारीपासून रुग्ण आणि होणारे मृत्यू यांचे प्रमाण १ टक्केच्या जवळ आले आहे. त्यामुळे लसीकरणाचा फायदा निश्चितच होत आहे. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक
आकडेवारी
एकूण कोरोना रुग्ण
१,१३,७०४
उपचार सुरू असलेले रुग्ण
१०९३०
लसीकरणाचा पहिला डोस घेतलेले
२,१७,६८७
लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेले
३५,९०२