जळगाव - भुसावळ येथे मित्राच्या लग्नासाठी पुणे येथून आलेल्या अभय शरद फेगडे (२५, रा. साकरी, ता. भुसावळ) या तरुण अभियंत्याचा शुक्रवारी (4 मे) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईकांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली. दरम्यान, हा मृत्यू उष्माघाताने झाला आहे की नाही?, हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकेल, असे वैद्यकीय अधिकरी डॉ. आशिफ शेख यांनी सांगितले.
पुणे येथून आला होता लग्नासाठी मूळ साकरी येथील रहिवासी असलेल्या अभय फेगडे याचे आई-वडील हे साकरी येथेच राहतात. अभियांंत्रिकीच्या शिक्षणासाठी अभय गेल्या 6 वर्षांपासून पुणे येथे राहत होता. शिक्षणानंतर त्याला दीड वर्षापूर्वीच नोकरी लागली आणि माहिती व तंत्रज्ञान अभियंता (आयटी इंजिनिअर) म्हणून तो खाजगी कंपनीत काम करीत होता.
४ रोजी मित्राचे लग्न असल्याने तो भुसावळ येथे आला होता. दुपारी लग्न सोहळ्यात मित्रांसोबत नृत्य केले, गप्पा मारल्या व जेवण केले. त्यानंतर मित्रांसोबत बसलेला असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले व त्याला उलटी झाली आणि तो खाली कोसळला. त्या वेळी त्याला तत्काळ भुसावळ येथेच खासगी रुग्णालयात हलविले. मात्र तेथून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
मित्रांना व नातेवाईकांना शोक अनावरअभयला जिल्हा रुग्णालयात आणले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्या वेळी त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना शोक अनावर झाला. घटनेची माहिती मिळताच अभयचे काका जिल्हा रुग्णालयात पोहचले. संध्याकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अभयचा उष्माघाताने मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
अहवालानंतर कारण स्पष्ट होणारअभयचा मृत्यू उष्माघाताने झाला की अन्य काही कारणामुळे या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांना विचारले असता शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
नोकरीसोबत उच्चशिक्षणही घेत होता अभयअभय हा अत्यंत होतकरू व हुशार मुलगा होता, तो पुणे येथे नोकरीला असताना एमबीएचे शिक्षणदेखील घेत होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. अभयच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, दोन बहिणी, मेहुणे असा परिवार आहे.
आठवडाभरात उष्माघाताचा चौथा बळीदिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून जिल्ह्यात उष्माघाताच्या बळींची संख्याही वाढत आहे. आठवडाभरात उष्माघाताचा हा चौथा बळी गेला आहे. २८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३० एप्रिल रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे याचा उष्माघाताने मृत्यू झाला.