जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील माधवराव राजाराम पाटील (४५) या स्वाईन फ्ल्यू संशयीत रुग्णाचा गुरुवारी दुपारी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने निपाणे गावात खळबळ उडाली असून नातेवाईकांनीही माधवराव यांना स्वाईन फ्ल्यू असल्याचा संशय व्यक्त केला आहे.या बाबत मिळालेली माहिती अशी की, माधवराव यांना १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी जळगावात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २० रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे असल्याने स्वाईन फ्ल्यूने पाटील यांचा मृत्यू झाल्याची निपाणे गावात चर्चा आहे. तसेच निपाणेचे माजी सरपंच श्रीधर पाटील यांनीही स्वाईन फ्ल्यूचा संशय व्यक्त केला. या बाबत पाटील यांच्यावर उपचार करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाचे डॉ. फराज बोहरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता पाटील यांना स्वाईन फ्ल्यू असल्याचा संशय आल्याने आम्ही स्वाईन फ्ल्यूची तपासणी करण्याविषयी नातेवाईकांना सांगितले. मात्र ही तपासणी करण्यास नातेवाईकांनी नकार दिला. स्वाईन फ्ल्यूचे निदान झाले नसले तरी तसा संशय असल्याने व त्यांच्या फुफ्फूसाचेही काम करण्याची प्रक्रिया थांबल्याने पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. बोहरी यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनात मृत्यूचे नेमके कारण समजले असते, मात्र शवविच्छेदन करण्यासही नातेवाईकांनी नकार दिल्याचे डॉ. बोहरी यांनी असे डॉ. बोहरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, निपाणे येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूने झाल्याची गावात चर्चा असून नातेवाईकांनीही त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे गावात उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.
निपाणे येथील स्वाईन फ्ल्यू संशयीत रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:59 PM
जळगावात उपचार
ठळक मुद्देनमुन्यांची तपासणी न केल्याने केवळ संशय