चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील रोकडे शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२ रोजी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येवून व्हिसेरा नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत माहिती अशी, तालुक्यातील रोकडे व बाणगाव शिवारात मध्यभागी सीमेवर असलेल्या सुपडू देवराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर झुडपात अडीच ते तीन वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृतदेह ११ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आढळला होता. शेतकरी सुपडू पाटील यांच्या शेतात लिंबूची बाग असल्याने त्या बागेला ठिबकने पाणी देण्यासाठी त्यांचा मुलगा ११ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शेतात गेलेला होता. तेव्हा शेताच्या बांधाकडून वास येत असल्याने तो त्या दिशेने गेला. बांधावर झुडूपामध्ये त्यास बिबट्या पडलेला दिसल्यामुळे त्याने घाबरून तेथून रोकडे गावी पलायन केले. गावापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या या शेतात बिबट्या पडला असल्याची माहिती त्याने घरी व गावात दिली. रोकडे गावचे उपसरपंच सुनील पवार, शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तेव्हा बिबट्या मयत स्थितीत आढळला. सुनील पवार यांनी लागलीच ही माहिती पोलीस स्टेशन, वनविभागाला दिली. वनविभागाचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रकाश देवरे, अजय महिरे, प्रवीण गवारे, संजय जाधव, संजय चव्हाण, वनमजूर श्रीराम राजपूत, बाळू शितोळे यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, धनंजय पवार, भटू पाटील, राहुल मांडोळे, संतोष सोनवणे, उपसरपंच सुनील पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर बिबट्या हा तीन वर्षांचा असून, नर जातीचा असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, बिबट्याचा मृत्यू कसा झाला हे सोमवारी निश्चित झाले नव्हते. त्याचे शरीर थोडेसे फुगलेले व थोडासा वास येत असल्यामुळे त्याचा मृत्यू रात्री किंवा सकाळी झाला असावा. तसेच सायंकाळी शवविच्छेदन करता येत नसल्यामुळे वनविभागाचे पथक रात्रभर त्या ठिकाणी थांबले. मंगळवारी सकाळी मृत बिबट्याचा जागेवरच पंचनामा करण्यात आला. पशुधन विकास अधिकारी डॉ.एम.बी.गुंडीमुडे, डॉ.दीप्ती कच्छवा व डॉ.संदीप भट यांनी हे शव विच्छेदन करून मृत बिबट्यास बाणगाव येथील बाळासाहेब देशमुख यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा अंदाज असून, त्याचा व्हिसेरा नाशिक शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.याप्रकरणी आसपासच्या शेतकऱ्यांचे जाबजबाब वनविभागाकडून घेतले जात आहेत. घटनास्थळी उपवनसंरक्षक जळगाव डिगंबर पगार, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनक्षेत्रपाल संजय मोरे, भरारी पथकाचे धनंजय पवार यांनी भेट दिली.मार्च महिना लागल्याने उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. पाटणादेवी जंगलात बिबट्यासह इतर प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. जंगलामध्ये उन्हाळ्यात पाण्याचा साठा कमी होत आहे. यामुळे बरेचसे जनावरे हे पाण्याच्या व खाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर येतात. मयत बिबट्यादेखील हा शिकारीसाठी अथवा पाण्याच्या शोधात आला असावा किंवा त्याचा घातपात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तीन चार वर्षांपूुर्वीही बिबट्याची शिकार करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार विषबाधेने झाल्याचा समोर आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव तालुक्यात ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू विषबाधेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 8:14 PM
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२ रोजी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येवून व्हिसेरा नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
ठळक मुद्देजागेवरच केले शवविच्छेदननर जातीचा होता बिबट्यारोकडे शिवारात केले अंत्यसंस्कारव्हिसेरा नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवलाआसपासच्या शेतकऱ्यांचे वनविभागाकडून जाबजबाब