एरंडोल : तालुक्यातील उमरदे येथील तीन मित्र आपल्या गावाजवळ असलेल्या पद्मालय तलावात पोहायला गेले असता शेखर राजेश पवार याचा पाय पोहतांना पॅन्टमध्ये अडकल्याने पाण्यात बुडुन त्याचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती स्व.द.द.पवार यांचा तो नातु होता. या घटनेमुळे उमरदे गावात शोककळा पसरली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल पासुन सुमारे चार किलोमीटर अंतरावर म्हसावद रस्त्यावर पद्मालय तलावात उमरदे येथील शेखर राजेश पवार (वय १८) हा महाविद्यालयीन विद्यार्थी समाधान सुरेश पवार व गटलु मोहन पवार या मित्रांसोबात पोहायला गेला असता शेखर च्या पायात पॅन्ट अडकल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला. ही घटना घडताच त्याचे मित्र धावत गावात गेले व त्यांनी ग्रामस्थांना सांगितले असता संदीप सुकदेव पाटील, दीपक भगवान पाटील व इतर ग्रामस्थांनी ा तलावाकडे धाव घेतली. पाण्यात शोध घेतला असता चार तासानंतर शेखरचा मृतदेह आढळुन आला. त्यानंतर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. मृत युवक हा एरंडोल महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए.च्या वर्गात शिकत होता. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार प्रदीप चांदेलकर,राजु पाटील व सुनिल लोहार हे तपास करीत आहे.
उमरद्याच्या तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 10:00 PM