जळगाव /पाळधी/पथराड : प्रेमविवाहानंतर मृत्यू झालेल्या तरुणीसोबतच तिचा प्रियकर तथा पती प्रशांत विजयसिंग पाटील (रा.पाळधी, ता.धरणगाव) याचाही शनिवारी पहाटे २ वाजता जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे दोघं कुटुंबियांनी एकमेकावर आरोप केले असून प्रियकराचे वडील विजयसिंग बाबुराव पाटील, त्याचा मित्र विकास धर्मा कोळी व विक्की उर्फ विजय संतोष बोरसे (रा.पाळधी, ता.धरणगाव), बहिण कविता सुनील पाटील (रा.जळगाव) व आरतीचे वडील विजय हरसिंग पाटील या पाच जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विजयसिंग पाटील व आरती विजय भोसले या दोघांनी प्रेमप्रकरणातून पलायन केले होते व नंतर प्रेमविवाह करुन परत आल्यावर दोनच दिवसात आरतीचा मृत्यू झाला होता. प्रशांत याच्या घरात ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. त्यानंतर प्रशांतच्याही मृत्यूची बातमी धडकली. त्यानंतर मुलाच्या कुटुंबियांना मुलीच्या कुटुंबावर आरोप केले. आरतीचे लग्न तिच्या आत्याच्या मुलासोबत ठरले होते, तरी देखील तुम्ही पळवून जावून लग्न केले. या कारणावरुन घरी जावून गोंधळ घातला, त्यामुळेच त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मुलाची बहिण कविता सुनील पाटील हिने दिली. त्यानुसार आरतीचे वडील विजय हरसिंग पाटील पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली.