साकळी : येथील अवघ्या चोवीस वर्षीय युवकाचा हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी घडली. मयत यशवंत उर्फ गोलू सोनार हा एकुलता एक मुलगा असून या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, साकळी ता.यावल येथील इंदिरा नगर प्लॉट भागातील रहिवासी असलेला यशवंत सुरेश सोनार (वय२४) यांची गेल्या एक- दोन दिवसापासून तब्येत खराब झाली होती. तेव्हा त्याने गावातील खाजगी डॉक्टरांकडून उपचार केल्यावर त्याला बरे वाटत होते. मात्र आज ७ रोजी सकाळी साडेनऊ वाजे दरम्यान यशवंतची तब्बेत अचानक खराब झाली व तो बेशुद्ध पडला. घटनेचे प्रसंगावधान साधून गल्लीतील तरुणांनी यशवंतला आहे त्या अवस्थेत तात्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ जळगाव येथे हलविण्याचे सांगितले. यामुळे प्रा.आ.केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच जळगाव येथे नेत असतांना जळगाव येथील शिवाजी पुलाजवळ रस्त्याचे सुरू असलेले काम व वाहतुकीची अडचण आल्याने अजून काही वेळ वाया गेला. जेव्हा यशवंतला खाजगी दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत यशवंत हा एकुलता एक मुलगा होता व त्याला एक विवाहित बहिण आहे. त्याच्या वडिलांचे गेल्या दहा वषार्पूर्वीच निधन झाल्याने त्याची विधवा आई त्याच्यासह कुटुंब सांभाळत होती. तो यावल येथील कला व वाणिज्य महाविदयालयाचा वाणिज्य शाखेचा पदवीधर विद्यार्थी होता. तो नोकरीच्या शोधात होता.साकळीसह परिसरातील अत्यवस्थ रुग्णांना बाहेर गावी नेण्यासाठी व त्याला प्रवासादरम्यान जलद उपचार मिळण्या संदर्भातील सोईसुविधा युक्त १०८ रुग्ण वाहिका नसल्याने अशा स्वरूपाच्या रुग्णांना नाहक जीव गमवावा लागतो. सुसज्ज रुग्णवाहिकेच्या असुविधेने यशवंतचा नाहक जीव गेला, असाही आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आहे.
साकळी येथील तरुणाचा उपचारासाठी नेताना रस्त्यातच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 9:56 PM