आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १८ - सांगली येथे कंपनीत कामावर जाण्यासाठी मध्यप्रदेशातून निघालेल्या देवकिशन कानाजी कनाडे (वय १९ रा. सताजना, ता.सनावद, जि.खरगोन) हा तरुण धावत्या रेल्वेतून पडून मृत झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. घटनास्थळी आढळून आलेले आधार तसेच मतदान कार्डावरुन या तरुणाची ओळख पटली.जळगाव ते शिरसोली दरम्यान खांबा क्रमांक ४१०/ २ च्या बाजूला रेल्वे ट्रॅकवर धावत्या गाडीतून हा तरूण सोमवारी रात्री पडला होता. या घटनेची माहिती गेटमनने म्हसावद स्टेशन मास्तर यांना दिली. तालुका पोलिसांनी तरुणास जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारापूर्वीच त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, हेडकॉन्स्टेबल राजेंद्र बोरसे यांनी घटनास्थळी आढळून आलेले आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदान कार्डावरुन ओळख पटवित नातेवाईकांना कळविले. वडील कानाजी कनाडे व नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालय गाठले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला. देवकिशन याचा मोठा भाऊ जयकिसन याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
जळगावात रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:41 PM