जळगाव : एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील आर.जे.पॉलिमर्स या चटई कंपनीत काम करताना मशीनवरील वायरपासून विजेचा धक्का लागल्याने रवींद्र हरी सोनवणे (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद नव्हती.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आर.जे.पॉलिमर्स ही कंपनी दत्तू मराठे यांनी कराराने चालवायला घेतली आहे. रवींद्र सोनवणे हा त्या कंपनीत काही दिवसापूर्वीच कामाला जायला लागला होता. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मशीनवरील वायरचा धक्का लागताच तो बाहेर फेकला गेला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्यासोबत काम करणारे चेतन बडगुजर, दीपक पाटील व अन्य तरुणांनी कंपनी मालकाच्या गाडीतूनच त्याला खासगी रुग्णालयात हलविले. तेथे उपचार केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मित्रांचाही मोठा गट असल्याने त्यांचीही रुग्णालयात मोठी संख्या होती. पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनीही रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली. माजी महापौर सदाशिव ढेकळे, माजी उपमहापौर सुनील महाजन, भूषण सोनवणे, गणेश सोनवणे आदींनी रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले.मदतीसाठी पुढाकारघरातील कमावता तरुण गेल्याने कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण सोनवणे, गणेश सोनवणे व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी रात्रीच पंचनामा केला. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन होणार आहे.
मुलगा गेल्याने प्रचंड आक्रोशरवींद्र हे चार भाऊ होते. त्यापैकी रवींद्र हा घरातील कर्ता व कमावता मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. ही घटना समजल्यानंतर आई अंजनाबाई व कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रचंड आक्रोश केला.