शेतकऱ्यांमधून समाधान : गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पटीपेक्षा अधिक कर्ज वाटप
जळगाव : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यामुळे शेतकरी कर्जमुक्त झाला व त्याला पुन्हा नवीन पीक कर्जाचा लाभ घेता आला. यामुळे बँकांकडूननही यंदा अधिक पीक कर्जाचे वाटप झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दीडपटीपेक्षा अधिक कर्जवाटप यंदा झाले असून बळीराजाही समाधानी आहे.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला कर्जाच्या खाईतून काढण्यासाठी सरकारतर्फे कर्जमुक्ती योजना राबविली गेली. मात्र गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या अटी व इतर कारणांमुळे बहुतांश शेतकरी कर्जमुक्त होऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांना नवीन कर्जही मिळणे अवघड झाले होते. मात्र मावळत्या आर्थिक वर्षात बळीराजाच्या खात्यात कर्जमुक्त योजनेची रक्कम जमा होऊन शेतकरी कर्जमुक्त झाला शेतकऱ्याचे खाते कर्जमुक्त झाल्याने त्याला नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे यंदा कर्ज वाटपाचेही प्रमाण वाढले. जिल्ह्यातील तीन वर्षातील उद्दिष्ट व कर्जवाटप यांची आकडेवारी पाहता यंदा हे प्रमाण चांगलेच वाढले आहे. २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात १ हजार ७०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी १ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले. यंदा कर्जमुक्तीचा लाभ मिळाला व कर्ज वाटपाचे प्रमाण वाढून थेट १ हजार ८०० कोटी रुपयांवर पोहचले.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत रखडले होते नवीन पीक कर्ज
सरकारने कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यानंतर आपल्यालाही या योजनेचा लाभ होईल या प्रतीक्षेत अनेक शेतकरी होते. त्यामुळे गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या वाट पाहत कर्ज भरलेच नाही. त्यामुळे त्यांना नवीन कर्जाचा लाभ होऊ शकला नाही. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली व नवीन कर्जही त्यांना मिळाले मिळाले.
---------------------
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाल्याने त्यांचे खाते कर्जमुक्त होऊन त्यांना नवीन कर्जाचे वाटपही करण्यात आले. यंदा जिल्ह्यात तब्बल १ हजार ८०० कोटी रुपयांची पीक कर्ज वाटप झाले आहे.
- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
कर्जमाफी योजनेची घोषणा झाली मात्र तिचा लाभ गेल्यावर्षी मिळाला नाही. त्यामुळे कर्ज भरता येत नव्हते. मात्र यंदा कर्जमाफीचा लाभ झाला व नवीन कर्जही मिळू शकले.
- अशोक जाधव, शेतकरी
महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळून आमचे खाते कर्जमुक्त झाले. गेल्या अनेक वर्षांपासून खात्यावर कर्ज असल्याने नवीन कर्ज मिळणे कठीण होते. मात्र यंदा नवीन कर्ज मिळाल्याने त्याचा मोठा आधार झाला.
- दिलीप चौधरी, शेतकरी
पीक कर्जाची आकडेवारी
२०१८-१९ - उद्दिष्ट २ हजार ८०० कोटी, वाटप १ हजार ७०० कोटी
२०१९-२० - उद्दिष्ट २ हजार ८०० कोटी, वाटप १ हजार १०० कोटी
२०२०-२१ - उद्दिष्ट ३ हजार २०० कोटी, वाटप १ हजार ८०० कोटी