महिंदळे, ता.भडगाव : तालुक्यातील महिंदळे येथील शिवाजी विजय पाटील (३५) या तरुण शेतकºयाने आपल्या स्व:मालकीच्या शेतात विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. ही घटना २४ रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवाजी विजय पाटील हे रात्री घरातून कुणाला काहीही न सांगता शेतात गेले व रात्री घरी परतले नाहीत. त्यामुळे सकाळी घरातील लोकांनी शोध घेतला असता शेतात ते विषारी औषध सेवन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घरातील कर्ता पुरुष असल्याने शेतीसाठी ते स्वत: कर्ज घ्यायचे. दरवर्षी घेतलेल्या कर्जाचा डोंगर नापिकीमुळे वाढतच होता. बॅँकेकडून घेतलेले कर्ज कसे फिटेले या विवंचनेत ते असायचे. यावर्षी घेतलेले कर्ज फिटले नाही व पुन्हा यावर्षी शेतीसाठी कर्ज कोण देणार या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.२४ रोजी दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. पोलीस पाटील अविनाश रंगराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महिंदळेत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 7:15 PM