कुऱ्हा काकोडा :
रवींद्र हिरोळे
कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर : सरकारने कितीही चांगल्या योजना काढल्या तरीही त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही. शासकीय गलथान कारभाराचा फटका अनेक लाभार्थ्यांना बसत असतो. यामुळे खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहतात. असाच प्रकार पीएम किसान योजनेच्या एका लाभार्थ्यासोबत घडला. जिवंत व्यक्तीला मयत दाखवून त्याला लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात समोर आला आहे.
थेरोळा, ता. मुक्ताईनगर येथील शेतकरी रोहिदास मारोती बज्जर यांचे थेरोळा शिवारात शेत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी रोहिदास बज्जर यांनी रीतसर नोंदणी केली असून त्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. मात्र काही काळानंतर त्यांना नियमित हप्ते येणे बंद झाले. आज ना उद्या आपले हप्ते येतील या आशेवर त्यांनी वाट पाहिली मात्र इतर शेतकऱ्यांना लाभ मिळत असताना आपण मात्र लाभापासून वंचित राहत असल्याची खंत त्यांच्या मनात होती.
खातरजमा करताच उघड झाला प्रकार हप्ता न येण्याचे कारण शोधण्यासाठी रोहिदास बज्जर यांनी ऑनलाईन स्थिती तपासली असता भलताच प्रकार समोर आला. त्याचे पीएम किसानचे खाते निष्क्रिय असल्याचे समजले आणि त्यासाठी जे कारण दिलेले होते ते म्हणजे रोहिदास बज्जर हे चक्क मयत झालेले आहेत हे होते.
ही स्थिती बघून ते स्वत:च हतबल झाले. जिवंत असूनही मयत दाखवून आपणास लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील
गलथान कारभारामुळे त्यांना हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. खोडसाळपणा तर नाहीपीएम किसान योजनेसंदर्भात काही अडचण असल्यास आपण सोडवून देऊ, अशा भूलथापा काही लोक अशिक्षित शेतकऱ्यांना देऊन त्यांची लुबाडणूक करीत आहेत. अशाच एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून आपण मयत असल्याची खोटी माहिती तहसील कार्यालयात देऊन खोडसाळपणा केला असावा अशी शंका रोहिदास यांनी उपस्थित केली असून या प्रकारची तक्रार तहसीलदार यांचेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.