भुसावळ, जि.जळगाव : देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला २४ रोजीचा 'महाराष्ट्र बंद' भुसावळ शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.शासकीय विश्रामगृहात बुधवारी संयुक्त बैठक उत्साहातझाली. त्यात बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, ए.आय.एम.आय.एम, जनाधार पार्टी, राष्ट्रीय दलित पँथर, शहर संविधान बचाव समिती, भीमआर्मी संघटना, राष्ट्रीय हाकर्स सेना, माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह विविध संघटना पक्ष संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. बैठकीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.बंद यशस्वीतेसाठी व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन यासह विविध हॉकर्स संघटनांना बंद पाळण्याबाबत विनंती करणारे पत्र दिले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश विखारे, जनाधार पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, भारत मुक्ती मोर्चाचे हमीद शेख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, संविधान बचाव समितीचे अध्यक्ष सलीम सेठ चुडीवाले, साबीर शेख, एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोज, नगरसेवक ललित मराठे, माजी नगरसेवक भीमराज कोळी, युवराज पाटील, भीमआर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, वंचितचे तालुकाध्यक्ष रुपेश साळुंखे, विद्यासागर खरात, प्रल्हाद घारू, मुन्ना सोनवणे, वंचितचे शहराध्यक्ष गणेश जाधव, नीलेश जाधव, वंचित महिला आघाडी महासचिव वंदना सोनवणे, उपाध्यक्ष संगीता भामरे, गणेश इंगळे, सुनील ठाकूर, नीलेश जाधव, शुभम सोयंके, सुदाम सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करण्याचा भुसावळ येथील बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:09 PM