लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादीचे महानराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी गुरुवारी तडकाफडकी पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी केल्यानंतर शहर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह वाढला असून ज्येष्ठ आणि युवक असे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. यात आता अभिषेक पाटील यांना पाठिंबा म्हणून शहरातील १२ विविध सेलच्या अध्यक्षांनी कार्यकारिणी सदस्यांसह सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे देणार असल्याचे शुक्रवारी युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. विशेष बाब म्हणजे या सर्वांनी नाव न घेता काही ज्येष्ठ नेत्यांवर ठपका ठेवला आहे.
अभिषेक पाटील यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे आपल्याला पदावरून कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली. यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादी शहरच्या १२ सेलच्या अध्यक्षांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. दरम्यान, याबाबत अद्याप जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांना माहिती दिली नसल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्ष लागलीच रवाना
१२ विविध सेलचे पदाधिकारी आपली भूमिका मांडणार होते. त्या आधी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील हे पक्षकार्यालयात थांबून होते. मात्र, काही वेळानंतर ते या ठिकाणाहून रवाना झाले. त्यानंतर सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडली. यात अभिषेक पाटील यांच्यासोबत युवकांनी राष्ट्रवादी संघटन वाढीसाठी प्रयत्न केले. कमी वेळात विधानसभेला चांगली टक्कर दिली. मात्र, स्थानिक नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या, एक तरुण नेता जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याचे पाय खेचण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका युवकाध्यक्षांनी पक्षातील ज्येष्ठांवर केली. दरम्यान, प्रत्येक सेलमध्ये किमान ३० कार्यकर्ते आहेत त्यानुसार ३५० पर्यंत कार्यकर्त्यांचे हे राजीनामे असतील, असे नेमाडे यांनी सांगितले.
कोट
आपल्याला याबाबत काहीच कल्पना नाही. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. तरी संघटना विस्कळीत होईल असे कोणी करू नये. - ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
पदाधिकारी मुंबईला जाणार
जुने स्थानिक ज्येष्ठ नेते यांना नवीन तरुण वर्ग पुढे आलेले सहन हात नसून त्यांनी चुकीच्या तक्रारी करून अभिषेक पाटील यांच्यावर दबाव आणला आहे. त्या घटनेचा निषेध म्हणून हे सामूहिक राजीनामे देत असल्याचे युवकचे अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, नेमके ज्येष्ठ नेते कोण याबाबत विचारणा केली असता त्यांनी नाव घेण्यास नकार दिला. दरम्यान, दोन दिवसांनी मुंबईला जाऊन प्रदेशाध्यक्षांकडे हे राजीनामे सुपुर्द करणार असल्याचे नेमाडे यांनी सांगितले.
हे पदाधिकारी देणार राजीनामे
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे, सामाजिक न्याय अध्यक्ष जितेंद्र चांगरे, पदवीधर अध्यक्ष अनिल पाटील, सचिव ॲड. कुणाल पवार, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्षा आरोही नेवे, वक्ता सेल अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक अध्यक्ष गौरव लवंगे, ओबीसी सेल अध्यक्ष कौशल काकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष हेमंत सोनार यांचा समावेश आहे.