जळगाव : भाजपतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे तिकीट पक्षाने कापल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मात्र खडसे यांनी आपली तलवार म्यान करीत पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य राहिल असे कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले.भाजपच्या पहिल्या व दुसऱ्या यादीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न आल्याने खडसे समर्थकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. भाजपने त्यांना तिकिट देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा या मागणीसाठी गुरुवारी दुपारी कार्यकर्त्यांनी त्याच्या फार्म हाऊसवर गर्दी केली. यावेळी काही कार्यकत्यानी प्रचंड घोषणाबाजी केली. खडसे यांच्यावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी घोषणाबाजी करीत काही कार्यकर्त्यांनी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. एका कार्यकर्त्याने रावेर येथे आत्मदहानाचा प्रयत्नही केला. काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सुमारे दोन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना सांगितले की, तुम्हाला तिकिट मिळणार नसल्याचे आपल्याला पक्षाने सांगितले. मात्र तुम्ही जो उमेदवार सुचवाल त्यांना तिकिट देऊ असेही सांगितले. त्यावर आपण पक्षाला तिकिट कापण्याचे कारण विचारले आहे. आपण कुणाचे नाव सुचविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारण आपल्यासाठी मतदार संघातील सर्वच कार्यकर्ते हे स्वत: सारखे अर्थात एकनाथराव खडसे सारखे असल्याचे त्यांनी पक्षाला कळविले आहे. पक्षाने आपल्याबाबत घेतलेल्या भूमिके मागे काही तरी कारण असावे. त्यामुळे पक्षाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहिल : एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 5:41 PM