विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया : काही म्हणतात, निर्णय योग्य
- डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)ने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र व गणित हे विषय वगळले आहेत. मात्र, अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय वगळले तर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे कसे, असा सवाल जाणकार व्यक्त करीत आहेत, तर विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. आता अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय एआयसीटीईने वगळले आहेत. गणित हा विषय अभियांत्रिकीचा पाया आहे. अभियांत्रिकीच्या जागा भरावयाच्या म्हणून घेतलेला हा निर्णय धोकादायक असून, एक ते दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हे समजेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील काही जाणकार नाराजी व्यक्त करीत असले तरी विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिल्ह्यात ९ महाविद्यालये
जळगाव जिल्ह्यात अभियांत्रिकीची ९ महाविद्यालये आहेत. दरवर्षी सुमारे चार ते पाच हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात असते. अजूनही विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीला पसंती दिसू येते. बऱ्याच वेळा जिल्ह्यातील विद्यार्थी इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी जातात. मात्र, जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या चांगली असल्यामुळे इतर जिल्ह्यांत शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्याही घटली आहे. दरम्यान, गणित व भौतिकशास्त्र वगळल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरसुद्धा परिमाण होऊ शकतो, असेही मत व्यक्त होत आहे.
अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. गणित विषयाशिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून इंजिनिअरिंगचा दर्जा घसरवायचा नसेल व मुलांना खोट्या आकर्षणाच्या सापळ्यात अडकवायचं नसेल तर भौतिकशास्त्र व गणित वगळू नये. तो निर्णय चुकीचा वाटतो. हा निर्णय संस्थाचालकांच्या दबावाखाली तर झाला नाही ना, अशीही शंका उपस्थित होते.
- अनिल राव, शिक्षणतज्ज्ञ
अभियांत्रिकीची अजूनही क्रेझ आहे. एआयसीटीईने घेतलेला निर्णय योग्य वाटतो. कारण अभियांत्रिकी फक्त कोअर अभियांत्रिकी अभ्यासक्रमापर्यंत मर्यादित नाही. यात बऱ्याच वेगवेगळ्या शाखांचा समावेश आहे. ज्यासाठी तार्किक दृष्टिकोन पाहिजे. बरेच विद्यार्थी उत्कृष्ट आहेत. म्हणून त्यांना अभियांत्रिकीचा प्रतिकूलपणा मिळाला पाहिजे.
- कृष्णा श्रीवास्तव
गणित व भौतिकशास्त्र हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. गणित, भौतिकशास्त्र वगळण्याच्या निर्णयामुळे भविष्यात गणित विषयाला फटका बसू शकतो. भौतिकशास्त्र व गणितावर इतर विषय अवलंबून आहेत. दरम्यान, या निर्णयावर एआयसीटीईने यू-टर्न घेतल्याचे कळते.
- गणेश चौधरी, विद्यार्थी
अभियांत्रिकी महाविद्यालय - ०९
जागा - ५००० (सुमारे)