सरपंच युवराज भिकाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वडली ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला उपसरपंच मोनिका पाटील, सदस्य अंजनाबाई पाटील, कल्पना पाटील, सविता पाटील, ज्योती पाटील, संभाजी पाटील, वसंत पाटील, रामचंद्र पाटील, गजानन पाटील, अरुण पाटील, ग्रामसेवक डी.पी. इंगळे आदी उपस्थित होते. ग्रामसभेत रेशन कार्ड व धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या. त्याशिवाय बेबी किटच्याही तक्रारी झाल्या. आरोग्य विभागाकडून पुरेशा सुविधा मिळत नाहीत. ग्रामसभेला गैरहजर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ज्या विभागाने आपली जबाबदारी पार पाडली नाही, त्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व पालकांचे संमतीपत्र घेतले जाणार असून ते संमतीपत्र व ग्रामसभेचा ठराव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला जाणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने ती वसूल करून स्व:उत्पन्नातून मोफत शुध्द पाणी व मोफत दळण यावरदेखील निर्णय घेण्यात आला.
स्वत:च्या जबाबदारीवर वडलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:19 AM