शासनाचा निर्णय लवकर जाहीर होत नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी या मागणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ८२ उमेदवारांची सामूहिक माघार
घेण्याचा ऐतिहासिक निर्णय बैठकीत घेतला. सोमवारी सर्वच उमेदवार माघारीचा
झेंडा हाती घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील लेवा पाटील सभा गृहात उमेदवार व राजकीय पक्ष कार्यकर्ते
यांची बैठक घेण्यात आली. प्रत्येकाने आपले विचार मांडले व अखेर सामूहिक
माघारीचा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी बैठकीला
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील माजी सरपंच पंकज महाजन, विकास
पाटील, माजी उपसरपंच कीर्तिकांत चौबे, योगेश पाटील तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे ,शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बराटे, एमआयएमचे आसिफ मुबलीक सय्यद बरकतअली, शेख चाॅद शेख अजीज ,अब्दुल सईद गनी, आनंद रंधे, गणेश चव्हाण, भूषण पाटील, संदीप पाटील, योगेश कोलते, दीपक खाचणे, चंद्रकांत भोळे, सचिन महाजन, वसीम अहमद यांच्यासह आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत माजी सरपंच पंकज महाजन यांनी नगरपंचायत निवडणूक व्हावी
यासाठी सर्वांनी माघारीची वज्रमूठ हाती घ्यावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी गावाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र निर्णय घ्यावा सर्वच उमेदवारांनी माघारी घेतली तरच कार्यवाही होईल, असे सांगून उपस्थिताना मार्गदर्शन केले. माजी सरपंच विकास पाटील उपसरपंच कीर्तिकांत चौबे, आनंद रंधे, चेतन बराटे यांच्यासह अनेकांनी आपले मत मांडले.
इन्फो
शाब्दिक चकमक अन् गोंधळ
माघारीचा निर्णय घेण्यासाठी सर्वजण एकवटले आहे. वॉर्डात परिवर्तन घडावे. निवडणुकीत
ज्येष्ठांनी माघार घेऊन तरुणांना व नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे
सांगण्यात आले. मात्र जनतेच्या केलेल्या विकासकामांच्या बळावरच निवडून येतो व
कार्य करतो असे प्रतिउत्तर आले यात सुरू असलेल्या शाब्दिक विपर्यास वरून वादाची ठिणगी पडली आणि एकच गोंधळ उडाला. चप्पल उगारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडली मात्र उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले. त्यामुळे वाद शांत झाला. दरम्यान, यावेळी
सूचना मांडताना शाब्दिक वादावादी झाली . पुन्हा शांततेत बैठकीत माघारीचा
निर्णय वर शिक्का मोर्तब करण्यात आले.
माघारीचा फुगा फोडण्याचा प्रयत्न...
सामूहिक माघारी करता सर्वजण तयार आहेत ना याकरिता प्रत्येकाला विचारणा केली जात
होती. त्यातील काही जणांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे माघारीचा फुगा फोडण्याचा प्रयत्न होता. अखेर सर्व उपस्थितांनी गाव विकासासाठी एकत्र या राजकारण करू नका, मतभेद विसरा, असे सांगून गाव हितासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्वांनीच पाठिंबा दर्शविला.
उपस्थिताना दिली माघारीची शपथ
सर्वांनीच पाठिंबा दर्शविलानंतर यातून कोणी फितुर होऊ नये याकरिता हात समोर घेत
माघारीची शपथ घेतली. माजी सरपंच पंकज महाजन यांनी माघारीची शपथ वाचन केले.
निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ८२ जणांनी उडी घेतली आहे. त्यात अनेक महिला
उमेदवारांचा समावेश आहे, मात्र बैठकीला दोनच महिला उमेदवार उपस्थित होत्या.
सोमवारी सकाळी १० वाजता सर्व उमेदवारांनी एकत्र जमून माघारी घेण्याचा निर्णय घेतला.
समिती गठित
उमेदवारांची माघारी कार्याच्या प्रक्रियेसाठी समितीत गठित करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह गावातील विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.