विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्पांचा उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये १५.४१ टीएमसी म्हणजेच ३०.५८ टक्के उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ३७.३५ टक्के म्हणजेच ६.७७ टक्के इतका जास्त होता. दिलासादायक बाब म्हणजे यंदा अद्याप सलग जोरदार पाऊस नसला तरी जळगाव शहर व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणात ६०.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र तोही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच आहे.
हवामान खात्याने यंदा जून महिन्यात पावसाची सरासरी कमीच वर्तविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सलग असा जोरदार पाऊस झालेला नाही. मध्येच पाऊस होतो व नंतर उघडीप देत आहे. त्यामुळे बळीराजासह धरणसाठ्यांमध्येही वाढ होण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा जोरदार पाऊस नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून वाघूर व गिरणा धरण १०० टक्के भरल्याने त्यात जून महिन्यापर्यंत चांगला जलसाठा राहण्यास मदत झाली. मात्र यंदा पाऊस लांबतच असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणसाठ्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये ४०.२८ टक्के जलसाठा होता तो आता ३५.३७ टक्क्यांवर आला आहे.
मध्यम प्रकल्पात १० टक्क्यांहून अधिक घट
गेल्या वर्षी मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.१६ टक्के जलसाठा होता तो आता २७.७७ टक्क्यांवर आला आहे तर लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी असलेला १८.०९ टक्के साठा आता ८.४६ टक्क्यांवर आला आहे.
सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर धरणात १७.६५ टक्के (गेल्या वर्षी१८.४३ टक्के), गिरणा धरणात ३२.१७ टक्के (गेल्या वर्षी ३४.४९ टक्के) तर वाघूर धरणात ६०.२९ टक्के (गेल्या वर्षी ७४.९१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर १३ मध्यम प्रकल्पांमध्ये २ टीएमसी, ९६ लघु प्रकल्पात ०.५९ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून आजच्या दिवशी या सर्व प्रकल्पांमध्ये १५.४१ टीएमसी म्हणजेच ३०.५८ टक्के साठा आहे. तर मागील वर्षी हा साठा १८.५३ टीएमसी इतका होता.
तीन मध्यम प्रकल्पात ठणठणात
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. यात अग्नावती, हिवरा, बोरी या मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. मन्याड धरणातही केवळ ६.४३ टक्के जलसाठा शिल्ल्क आहे. या शिवाय अभोरा मध्यम प्रकल्पात ६६.१४ टक्के, मंगरूळ ४२.३६ टक्के, सुकी ७१.०८ टक्के, मोर ५४.०८ टक्के, तोंडापूर ४२.१५ टक्के, बहुळा २१.१६ टक्के, अंजनी १६.८८ टक्के, भोकरबारी १५.३८ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.