लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अन्य रक्तगटांपेक्षा ओ पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह या रक्तगटाच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण हे त्या तुलनेने कमी असते, असा विदेशात अभ्यास झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली. मात्र, आपल्याकडे त्या दृष्टीेने विश्लेषण झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या काळात सध्या रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात फुफ्फुसामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्णांचा मृत्यू होत असून, काहींच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊनदेखील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अनेक वेळा रक्ताच्या गाठी होऊन फुफ्फुसाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यास अचानक मृत्यू ओढवू शकतो, असे डॉ. नाखले यांनी सांगितले.
गंभीर होण्याचे प्रमाण कमी का?
अन्य रक्तगटांपेक्षा ओ पॉझिटिव्ह व आरएच निगेटिव्ह या रक्तगटाच्या व्यक्तींच्या शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया ही कमी असते. त्यामानाने ती ए, बी, आणि एबी या रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये अधिक असते. यामुळे रक्त गोठून होणाऱ्या व्याधी, धोक्यांचे प्रमाण हे ओ पॉझिटिव्ह या रक्तगटांच्या व्यक्तीत त्या तुलनेत कमी असते. कोरोना काळात रुग्णाच्या शरीरात रासायनिक पदार्थांची निर्मित होऊन रक्त गोठण्याचे प्रमाण वाढते. मात्र, ओ पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरात ते कमी प्रमाणात असल्याने साहजिकच कोरोनाच्या संसर्गात त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण हे कमी असल्याचा हा अभ्यास इंग्लडंच्या एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्याचे डॉ. नाखले यांनी सांगितले.
रक्तगट नोंदणी नाही
आपल्याकडे प्रत्येक रुग्णाला रक्त तपासणी करण्याची गरज नसते, ज्यांना संसर्ग अधिक आहे. त्यांच्याच रक्ततपासणीचे डॉक्टर सूचवितात. मात्र, संसर्गाचे प्रमाण समजण्यासाठी रक्ततपासणी आवश्यक असल्याचे मत काही डॉक्टर व्यक्त करीत असतात. सौम्य लक्षणे असलेल्यांना त्याची गरज नसल्याचे काही डॉक्टर सांगतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या रक्तगटाची नोंदणी नसते, शिवाय तशा दृष्टीकोनातून आपल्याकडे अभ्यास किंवा विश्लेषण झालेले नाही, असेही डॉ. नाखले यांनी सांगितले.