कजगाव, ता. भडगाव : आमदार किशोर पाटील यांनी कजगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या गाऱ्हाणी, अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या नव्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व दहा बेडच्या हॉलचे उद्घाटन आमदार पाटील व सभापती डॉ. अर्चना पाटील यांच्या हस्ते पार पडले.
संत सावता महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या. यात कजगाव पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती, नवीन कॉलनी भागात इलेक्ट्रिक खांब, इलेक्ट्रिक बिल अव्वाच्या सव्वा, मीटरमध्ये बिघाड केला असल्याची बतावणी करत हजार रुपयांपासून पंचवीस तीस हजारांपर्यंत बिल दिले जात असल्याची तक्रार, कजगावच्या आरोग्य केंद्रात चोवीस तास डॉक्टर, अंगणवाडी बांधकाम, कब्रस्तानला संरक्षक भिंत यासह अनेक समस्या व मागण्या नागरिकांनी मांडल्या, त्या सोडविण्याचे आश्वासन देत आमदार निधीतून कजगावसाठी आतापर्यंत अंदाजे चार कोटींची कामे व एकवीस कोटींचा रेल्वे उड्डाणपूल असे पंचवीस कोटींची कामे दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार किशोर पाटील, सभापती डॉ. अर्चना पाटील, डॉ. विशाल पाटील, जि. प. सदस्य जालिंदर चित्ते, संजय पाटील, युवराज पाटील, जे. के. पाटील, विलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच वैशाली पाटील, रफिक तांबोळी, माजी जि. प. आरोग्य सभापती एकनाथ महाजन, दिनेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, राजू चव्हाण, अनिल टेलर, अनिल महाजन उपस्थित होते.
रुग्णवाहिका व दहा बेडच्या हॉलच्या उद्घाटनप्रसंगी आमदारांनी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांचे कौतुक केले. डॉक्टरांचे आई-वडील दोघांना कोरोना झालेला असतानादेखील डॉ. पाटील यांनी रुग्णसेवेला महत्त्व दिले. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे, असे आमदार पाटील म्हणाले.