दीपनगर जि.जळगाव : विजेची मागणी कमी झाल्याने, महाजेनकोच्या दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक पाच बंद करण्यात आला आहे. आता या वीजनिर्मिती केंद्राच्या नवीन प्रकल्पातील संच क्रमांक चारमधून वीज निर्मिती सुरू आहे, अशी माहिती दीपनगर केंद्राचे जनसंपर्क अधिकारी सचिन कवितके यांनी दिली.
दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील चार व पाच क्रमांकाच्या संचमधून वीज निर्मिती सुरू होती. मात्र, विजेच्या मागणीत पुन्हा घट झाली. यामुळे संच पाच बुधवार रोजी दुपारी १२ वाजेपासून बंद करण्यात आला, तर १२ जूनला विजेची मागणी घटल्याने वीजनिर्मिती प्रकल्पातील प्रत्येकी पाचशे मेगावॅटचे दोन संच बंद करण्यात आले होते.
दीपनगरातील फ्लाय ॲशमुळे परिसरातील शेकडो मजुरांना रोजगार मिळतो, आता यातील एक संच बंद असल्याने, मजुरांना बेरोजगारीचा प्रश्नही उभा राहिला आहे.
कोट
विजेच्या मागणीत वाढ झाल्यास पाचव्या क्रमांकाचा संच सुरू करण्यात येईल.
- प्रकाश खंडारे, मुख्य अभियंता, वीज निर्मिती दीपनगर