भुसावळ : यावर्षी सर्वदूर, सार्वत्रिक असा मान्सूनपूर्व व मान्सून दाखल झाल्यानंतरचा पाऊस संपूर्ण मृग नक्षत्रात झाला नाही. मान्सून दाखल झाल्याचा हवामान विभाग भलेही अंदाज वर्तवीत असला तरी प्रत्यक्षात काही ठिकाणचा अपवाद सोडता पावसाच्या रूपात धो-धो असा पेरण्याजोगा सलग ६०-७० मिली पाऊस पडलाच नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांची, पीक लागवडीच्या तीनतऱ्हा झाल्या आहेत. ज्या पेरण्या झाल्या त्याही पावसाअभावी वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतातुर आहे.
आठ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले व २१ जूनला संपले. मंगळवारी आद्रा नक्षत्र लागेल. मागील दोन वर्षेे सात-आठ जूनलाच मृग नक्षत्रात चांगला पाऊस होत पेरण्या मार्गी लागल्या होत्या. दुबार पेर, पेरण्यांची मोड झाली नाही. यावर्षी मान्सूनपूर्व व मृगाचा पाऊस कुठेतरी एका तालुक्यात एका टोकाला झाला तर दुसऱ्या टोकाचा शिवार कोरडा अशी स्थिती आहे. कृषिविभाग ६०-७० मिलिमीटरच्या वर पाऊस झाल्यावरच पेरण्यांची शिफारस करते. बहुसंख्य कृषिमंडळात तो आजवर झालेला नाही. जेथे झाला तेथे सलग न होता दोन-चार दिवसांची टक्केवारी मिळून तो ६०-७० मिलिमीटरवर गेला. ते पेरण्यांसाठी लाभदायक नसते. यामुळे अनेक ठिकाणी स्थिती चिंताजनकच म्हणावी आहे. पेरण्यांची व कोरडवाहू शेतकऱ्यांची मृग नक्षत्रावर व मृगावरच भिस्त असते. यावर्षी मृगाच्या मृगजळात शेतकरी सापडला आहे.
वेगवेगळ्या पद्धतीने पेरण्या
दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाभरीच्या चाड्यावर मूठ धरत ७०-८० टक्के कडधान्य, धान्यवर्गीय, तेलबिया व वायवन कपाशीची पेरा होई त्यास पेरण्या म्हणत. आता लागवड व टोकण ही पद्धत रुढ झालिये. ती सर्रासपणे बकसंच, सरी-वरंबा, तुषारसंच अशी सिंचनावर केली जाते. यावर्षी ज्या काही पेरण्या झाल्या आहेत. त्यावरील पद्धतीने किंवा तशी सोय असलेल्यांनीच धाडस केले आहे. यावर्षीच्या नव्हे, तर मागील वर्षीच्या झालेल्या चांगल्या पावसावर, विहिरींना असलेल्या पाण्यावर सर्वाधिक कपाशी, मका लागवड होत आहे व झाली आहे. जवळजवळ तीस ते साठ टक्के तालुकागणिक सिंचनाच्या सोयीनुसार हे प्रमाण आहे. हा झाला पेरण्यांचा एक गट, दुसऱ्या गटात एकाच तालुक्यात पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे गट-तट पडले आहेत. जिथे पाच-सात इंच जमिनीत ओल झाली व तेथील ज्या शेतकऱ्यांनी धाडस केले व पेरणी केली आणि त्यानंतर पुन्हा त्यावर बियाणे अंकुरण येण्याइतपत पाऊस झाला त्या पेरण्या मार्गी लागल्यात. हे प्रमाण दहा ते तीस टक्के अंदाजे तालुक्यापुरते थोडेफार कमी-अधिक आहे. पेरण्याची तिसरी तऱ्हा व प्रकारात ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन-चार दिवसांत मृगाच्या झालेल्या पावसावर किंवा मृगपेरणीची वाफ साधण्यासाठी पेरणी उरकून घेतली; परंतु त्यावर अद्याप पाऊसच झाला नाही त्या पेरण्या. त्यांचे प्रमाणदेखील तालुकानिहाय असमान आहे. ते अंदाजे पाच-दहा टक्के आहे. यामुळे यावर्षी सर्रासपणे एकाचवेळी, सार्वत्रिकपणे पेरण्या किंवा लागवड झाली असे चित्र कुठेच नाही.