विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत फेसबुकवरील आम्ही वारकरी नावाच्या पेजवर बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद देशमुख (४२, रा.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, दि.१८ रोजी संध्याकाळी ७ वाजता देशमुख हे फेबसुक पाहत असताना आम्ही वारकरी नावाच्या पेजवर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत महिलेचा संदर्भ देत बदनामीकारक वक्तव्य केले.त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४९९ व ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.