लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव तालुक्यातील मोहाडी गावाने यंदाही बिनविरोधचा नारा दिला आहे. ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी ११ अर्ज आले आणि सर्वच वैधही ठरल्याने आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
मोहाडी ग्रामपंचायतीची १९५९ मध्ये स्थापना झाली. २०११च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही ४ हजार १०२ होती. जि.प.चे माजी अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी गावात ही बिनविरोधची परंपरा सुरू केली. तेव्हापासून सलग दहा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये गावात मतदानच झालेले नाही. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर आता ४ रोजी माघारीच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट नसताना मोहाडीत मात्र ५० वर्षांपासूनचे चित्र आधीच स्पष्ट झाले असून, यंदाचे हे बिनविरोधाचे ५५वे वर्ष आहे. दरम्यान, मोहाडीची जबाबदारी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन पाचवणे यांनीही मोहाडीत ११ जागांसाठी ११ अर्ज आले असून, सर्व वैध असल्याचे सांगत सर्वांची यंदाही बिनविरोधच निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे सांगितले.
अशी होते निवड
निवडणुका लागल्या की ग्रामस्थांची सामूहिक बैठक होते आणि त्यात पुन्हा बिनविरोधाचा नार दिला जातो. उमेदवार ठरविले जातात आणि निवडणूक टाळून सर्वानुमते जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार ठरून अर्ज दाखल केले जातात. वर्षानुवर्षांची ही परपंरा यंदाही कायम ठेवण्यात ग्रामस्थ व नेत्यांना यश आले आहे. प्रत्येकाला संधी मिळेल असे नियोजन केले जाते. नाराजीनाट्याला थारा न देता सर्वानुमते निर्णय होत असतात.
कोट
स्व. भिलाभाऊंनी सुरू केलेली बिनविरोधची परंपरा यंदाही कायम आहे. गावात कुठलेच राजकारण, मतभेद नसतात. यामुळे विकासकामांमध्ये सुटसुटीपणा आणि पारदर्शकता अधिक असते. सर्व ग्रामस्थ मिळून निर्णय घेत असतात.
- पवन सोनवणे, जि. प. सदस्य
कोट
गावाची परंपरा, स्व. भिलाभाऊंचा शब्द या सर्व बाबीं कायम आहेत. गावात पक्षाचा कुठलाच विषय नसून ग्रामस्थांच्या बैठकीत बिनविरोधचा निर्णय घेतला जातो. यामुळे गावाच्या विकासात अडथळा येत नाही. मने खराब होत नाहीत.
- प्रभाकर सोनवणे, माजी सभापती, तथा जि. प. सदस्य